पुणे – पुस्तकी किंवा जुने काॅम्प्युटराईज वाहन परवाना असेल आणि त्याचे नूतनीकरण करायचे असल्याच आता नागरिकांना २०० रुपये जादा शुल्क भरावे लागणार आहे. या शुल्कवाढीबाबत परिवहन विभागाने कोणतीही पूर्व सूचना न देता २०० रुपये घेण्यास सुरूवात केल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ज्या नागरिकांकडे पुस्तकी वाहन परवाना आहे. तसेच, काही जुने काॅम्प्युटराईज वाहन परवाना दिला आहे. या परवान्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा आरटीओकडे जाऊन परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. पूर्वी परवाना नूतनीकरासाठी गेल्यानंतर नागरिकांना त्यासाठी संबंधित ६५८ रूपयाचे शुल्क भरावे लागत होते. परवाना नूतनीकरणाचे पैसे भरल्याची पावती झाल्यानंतर बायोमेट्रीक विभागाकडे जाऊन सर्व माहिती द्यावी लागत होती.
माहिती दिल्यानंतर काही दिवसांमध्ये वाहन परवान्याचे नूतनीकरण होत होते. त्याचे स्मार्ट कार्ड पोस्टाने घरी येत होते. पण, दोन दिवसांपासून या कामासाठी २०० रुपयांचे शुल्क वाढल्याचे दिसून येत आहे. त्याची माहिती थेट परवाना नूतनीकरणाच्या वेळीच नागरिकांना समजत असल्याने गोंधळ उडता आहे.
‘अल्टर डीएल फोटो प्लस’ नावाने…
जुना परवाना नूतनीकरणासाठी आलेल्या नागरिकांना ६५८ रूपयांचे शुल्क भरावे लागतेच. पण, बायोमेट्रीक माहिती देण्यास जाण्याअगोदर २०० रुपयांची एक पावती करावी लागत आहे. त्या पावतीवर आकारले जाणारे शुल्क हे ‘अल्टर डीएल फोटो प्लस’ नावाने घेतले जात आहे. स्मार्ट कार्डवरील फोटोसाठीच हे शुल्क घेतले जात आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या शुल्कवाढीची परिवहन विभागाने कोणीतही माहिती दिलेली नसताना आचानक शुल्क वाढले कसे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.