पुणे- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रारूप विकास योजनेसाठी सोमवारी (दि. 28) पार पडलेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सदस्यांना प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. पीएमआरडीएकडे 61 हजार हरकती आल्या असून या हरकती, सूचना दाखल करणाऱ्या प्रत्येकाला सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.
आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या (पूर्वीचे पीसीएनडीटी) कार्यालयात नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी तानाजी सावंत, अजित बाळकृष्ण आपटे आणि डॉ. राजेंद्र जगदाळे, रामनाथ झा, राजेंद्र पवार, सुधाकर बा. नांगनुरे, डॉ. राहुल कराळे आदी सदस्य प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सहभागी झाले.
डॉ. दिवसे म्हणाले, पीएमआरडीएने 2 ऑगस्ट 2021 रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर केला होता. त्यावर तब्बल 61 हजार हरकती या पीएमआरडीएकडे दाखल झाल्या आहेत. या हरकतींची पडताळणी नियोजन समिती सदस्य येत्या काही महिन्यांत करणार आहे. त्यामुळे हरकती नोंदवणाऱ्या प्रत्येकाला सुनावणींबाबत नोटीस पाठवण्याची प्रक्रिया येत्या दोन ते चार सुरू करण्यात येणार आहे. नोटीस पोस्टातून, मोबाइलवर, मेसजद्वारे, ई-मेलवर तसेच गावात प्रत्यक्ष नोटीस पाठवण्यात येणार आहे.
उपलब्ध हरकती, सूचना दाखल करणाऱ्या प्रत्येकाला सुनावणीसाठी हजर राहण्याची तारीख देण्यात येणार आहे. पुढील चार महिन्यांत या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार सर्व हरकतीधारकांना सुनावणीच्या नोटीसा पाठवण्यात येतील.
– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त पीएमआरडीए