पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेविरोधात (शिंदेगट) साजरा केलेल्या “गद्दार’ दिवसाच्या आंदोलनावरून पुण्यात पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आले आहेत. यावरून राजकीय शेरेबाजी रंगल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आंदोलन
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण होत आहे. शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील 40 आमदार मागील वर्षी दि.20 जून गुवाहाटीला गेले होते. या दिवसाचा निषेध म्हणून राज्यभरात शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून राज्यात आंदोलने केली जात आहेत. पुण्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यात शिवसेनेच्या नेत्यांवर “पन्नास खोके एकमद ओके’ अशी टीका करण्यात आली.
आधी तुमची खोकी मोजा : शिवसेना
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनाचा खरपूस समाचार शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी घेतला. “ज्या पक्षाचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात आत गेले. महापालिकेत सत्ता असताना ज्या पक्षाची भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे समोर आली. त्या पक्षाने आमच्याविरोधात खोक्यांची भाषा न करता आधी आपण विकासकामांच्या नावाखाली किती खोकी जिरवली, याचा हिशेब जनतेसमोर ठेवावा,’
अशा खरपूस शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आले. काहींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे किमान राष्ट्रवादीने तरी आपला इतिहास पाहता आमच्याकडे बोट दाखवू नये, अशी टीका भानगिरे यांनी केली.