तात्पुरत्या जाहिरातींसाठी निश्चित होणार जागा
पुणे – नेत्यांच्या वाढदिवसापासून ते अन्य कार्यकर्ते आणि राजकीय कार्यक्रमांचे फ्लेक्स लावून गल्लीबोळांचे विद्रूपीकरण केले जाते. आता या चमको जाहिरातदारांना महापालिका हक्काची जागा उपलब्ध करून देणार आहे. अशा जाहिरातदारांना तात्पुरत्या स्वरुपात जागा निश्चित करून देण्याचे आदेश राज्यशासनाने महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार, महापालिका शहरात अशा जागांचा शोध घेत असून प्रतिदिन 40 रुपये चौरस फूट दराने शुल्क आकारण्यात येणार आहे.
तात्पुरत्या जाहिरातदारांसाठी जागांची यादी निश्चित करण्याचे काम अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून सुरू आहे. ही यादी राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. शहरात दरवर्षी सुमारे दोन ते तीन लाख अनधिकृत जाहिरातफलक, बोर्ड, बॅनर्स, फलक काढले जातात. त्यावर कारवाईसाठी लाखो रुपयांचा खर्चही केला जातो.
तर, या जाहिराती रोखण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, ही कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे दोन्हीं स्थितीत महापालिकेलाच नुकसान सहन करावे लागते.
याशिवाय न्यायालयानेही अशा तात्पुरत्या जाहिरातींसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यशासनाकडून महापालिकेस या जागा
निश्चित करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.