Pune News : वकीलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणुक दुसर्यांदा लांबणीवर पडली आहे. यापुर्वी, 31 जानेवारी रोजी होणारी निवडणूक 16 फेब्रुवारी रोजी होणार होती. त्यानंतर, ही निवडणूक आत्ता 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.
न्यायालयातील अशोका सभागृह येथे मतदानासह त्याचदिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दादाभाऊ शेटे आणि निवडणुक आयुक्त एन. डी. पाटील यांनी दिली. मतदानाच्या आदल्या दिवशी दुसर्यांदा निवडणूक लांबविल्याची ही घटना बारच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे.
निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभाराविरोधात पुणे बार असोसिएशनच्या काही माजी अध्यक्षांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. त्यावर, कौन्सिलने पुणे बारला कारणे दाखवा नोटीस काढत अध्यक्षांसह निवडणुक निर्णय अधिकार्यांकडे याबाबत विचारणा केली.
त्यावर, बारने आपले म्हणणे कौन्सिलला बुधवारी सादर केले. याप्रक्रियेत वेळ गेल्याने निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय उमेद्वारांच्या सहमतीने व सर्वानुमते घेण्यात आला आहे.
यंदा निवडणुकीसाठी 7 हजार 976 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान प्रक्रिया हे मतपत्रिकेद्वारे होणार असून यावेळी सीसीटीव्हीचीही व्यवस्था असणार असल्याचे शेटे यांनी नमूद केले.