दोन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये घबराट ; शेतकरी, शेतमजुरांनी शेतातील कामे थांबवली
मांजरी : कोलवडी व मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गेली एक -दिड महिन्यापासून उसाच्या शेतात बिबट्या आढळून आल्याने येथील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्याने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
कोलवडी व मांजरी खुर्द गावाच्या शिवेच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. काही दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्यांच्या उसात बिबट्याचे ठसे आढळून आले होते. तर एका ठिकाणी उसाची तोडणी सुरू असताना ऊसतोड कामगारांना बिबट्या दिसून आला होता. तेथील काही कुत्रीही गायब झाल्याची तक्रार होती.
एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील एक गाईचे वासरू ही या बिबट्याने फस्त केले आहे.गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास काही शेतकऱ्यांना कामिनी आणि उसाच्या शेतात बिबट्या निदर्शनास पडला. त्यांनी त्याचा व्हिडिओही काढला आहे.
त्यातून बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यापासून असलेला धोका लक्षात घेऊन वनखात्याने तेथे पिंजरा लावावा व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी दोन्ही गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरात बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वेळोवेळी कर्मचारी पाठवून खात्री केली जात आहे. काल पुन्हा बिबट्या दिसल्याचे सांगितल्यानंतर रेशक्यु टीम व कर्मचारी पाठवले असून त्याची तपासणी केली जात आहे. याठिकाणी लपण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा असून बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.जुन्नर ते सासवड या पट्ट्यात बिबट्या वावरताना आढळून येतो आहे.
सुरेश वरक, वन परिक्षेत्र अधिकारी, पुणे