Pune : कात्रज उद्यानांमधील बिबट्या बाहेर पळाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. यानंतर उद्यान प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांसाठी बाग बंद करण्यात आली. अखेर आज ४८ तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. हालचाली टिपणाऱ्या कॅमेऱ्यासह ९ पिंजरे परिसरात लावण्यात आले होते. त्यानंतर तो एका पिंजऱ्यात अडकला. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास तो अलगद पिंजऱ्यामध्ये अडकला.
पकडण्यात आलेल्या बिबट्याचे नाव सचिन असून तो 7.5 वर्षांचा आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी उद्यान परिसरातील सर्व CCTV देखील तपासण्यात आले होते. मंगळवारी पहाटे ४:५३ च्या सुमारास बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती दिली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी सांबर खंदकाजवळ त्याचे ठसे आढळले होते. अखेर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले.
विविध दलांची घेतली मदत
मंगळवारी एकूण नऊ पिंजरे प्राणी संग्रहालयातील परिसरात लावण्यात आले. तसेच विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या यामध्ये ड्रोन कॅमेरे, थर्मल कॅमेरे, तसेच मोशन सेन्सर कॅमेरे, लावण्यात आले होते. यामध्ये अग्निशामक दल वन्यप्राणी बचाव पथक, महानगरपालिका कर्मचारी, प्राणी संग्रहालयातील कर्मचारी असे विविध जणांनी यामध्ये प्रयत्न केले.