भाजप अन् राष्ट्रवादीलाही करावी लागणार कसरत
पुणे – मध्यवर्ती पेठा भाजपला तर उपनगरांचा काही भाग राष्ट्रवादीला “सुटेबल’ नसल्याचे आरक्षण सोडतीतून निर्माण झालेल्या चित्रातून दिसून येते.
मध्यवर्ती भागातील प्रभागांची संख्या कमी झाली. यामुळे सदस्य संख्याही कमी झाली आहे. विशेषत: प्र.क्र. 17 (शनिवार पेठ-नवी पेठ), प्र.क्र. 18 (शनिवार वाडा-कसबा पेठ), प्र.क्र. 28 (महात्मा फुले स्मारकभवानी पेठ), प्र.क्र. 29 (घोरपडे उद्यान-महात्मा फुले मंडई) या प्रभागात भाजपचे आहे. प्र.क्र. 17 मधील एकच जागा सर्वसाधारण खुली असून, दोन जागांवर खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षण आहे.
याठिकाणाहून हेमंत रासने, धीरज घाटे या प्रमुख माजी पदाधिकाऱ्यांसोबत विद्यमान नगरसेवक राजेश येनपुरे हे देखील इच्छुक आहेत. दिवंगत नगरसेवक महेश लडकत यांचे बंधू शैलेश लडकत, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बापू मानकर, कसबा विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्यासह काही माजी नगरसेवकही इच्छुक आहेत.
जागा एक आणि उमेदवार अनेक अशी नेहमीप्रमाणे परिस्थिती या प्रभागात पक्षाची झाली आहे. त्यामुळे येथे उमेदवारी देताना पक्षाला “तारेवरची कसरत’ करावी लागणार आहे. तसेच घोरपडे उद्यान- महात्मा फुले मंडई या प्रभागातही एकच जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी असल्याने भाजपचे नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यापैकी एकालाच संधी द्यावी लागणार आहे. प्र. क्र. 28 मध्ये महिलांसाठी एकच जागा असल्याने आणि येथे भाजपच्या नगरसेविकांची संख्या अधिक असल्याने आता कोण आत राहणार आणि कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. येथे मागील कार्यकारिणीत आरती कोंढरे, सुलोचना कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर या नगरसेविका होत्या. हीच परिस्थिती प्र.क्र. 16 (फर्गसन कॉलेज – एरंडवणे ) या प्रभागात आहे,
येथे महिलांसाठी एकच जागा असून, येथे माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती पेठांमध्ये तिकिट वाटप करताना जशी भाजपचीच पंचाईत होणार आहे तशीच स्थिती उपनगरांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची होणार आहे. प्र. क्र.21 मध्ये राष्ट्रवादीचे बंडू गायकवाड आणि भाजपचे उमेश गायकवाड हे काका-पुतणे एकमेकांसमोर येणार हे निश्चित आहे. याशिवाय प्र. क्र.36 (कर्वेनगर) येथे दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत, यामुळे भाजपचे सुशील मेंगडे आणि राजाभाऊ बराटे यांच्यापैकी एकालाच उमेदवारी द्यावी लागणार आहे.
अशीच परिस्थिती प्र. क्र. 52 (नांदेड सिटी-सनसिटी) या प्रभागात असून, भाजपच्या प्रसन्न जगताप आणि श्रीकांत जगताप यांना तिकिटासाठी लढावे लागणार आहे. प्र. क्र.56 (चैतन्य नगर-भारती विद्यापीठ) येथे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक विशाल तांबे आणि युवराज बेलदरे हे एकाच प्रभागात उभे ठाकले आहेत. त्यामुळे स्वत:ला उभे राहता आले नाही तर खुर्ची आपल्याकडेच रहावी, यासाठी अडचणीत असलेले नगरसेवक कुटुंबातील व्यक्तीसाठी तिकीट मागणार का हे पहावे लागेल.