मंचर -निरगुडसर ता. आंबेगाव येथील ओंकार दिगंबर खिलारी याच्या नित्या केक शॉप या दुकानात बसलेल्या 19 वर्षीय तरुणाला सहा ते सात जणांच्या टोळक्याने मारहाण केली. चैतन्य रामदास ढोबळे (वय 19, रा. निरगुडसर, ता. आंबेगाव) असे मारहाण झोलेल्या नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेश घाडगे (रा. कवठे ता. शिरूर) व त्याच्या सहा ते सात मित्रांवर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य ढोबळे हा निरगुडसर येथील ओंकार खिलारी यांच्या नित्या केक शॉप दुकानात बसला असताना त्या ठिकाणी महेश घाडगे हा त्याच्या सहा ते सात मित्रांबरोबर आला दुकानात येऊन त्याने चैतन्य यास माझ्या मैत्रिणीचा नाद सोडून दे.
असे म्हणत शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्लॅस्टिकचा पाइप व प्लॅस्टिकच्या खुर्चीनेही मारहाण करण्यात आली असल्याचे चैतन्य ढोबळे याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान किरवे पुढील तपास करीत आहेत.