यवत/राहू -वाळकी (ता. दौंड) येथील विद्युत रोहित्र चोरीचा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले, अशी माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. सागर गोरख पवार (वय 25 रा. वाळकी, मूळ रा. राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमदनगर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दौंड तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून विद्युत रोहित्राच्या चोरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यामध्ये पुणे ग्रामीणभागामध्ये दिवसेंदिवस रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असताना या चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे महावितरणला डोकेदुखी झाली होती.
रोहित्र चोरीच्या वाढत्या घटनामुळे पोलीस प्रशासनापुढे या चोरट्याना जेरबंद करण्याचा मोठे आवाहन असताना यवत पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाने त्यावेळी देखील रात्रदिवस एक करून रोहित्र चोरीचे एकूण 46 गुन्हे उघडकीस आणून चोरट्याच्या 5 टोळ्या जेरबंद करून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल मोठ्या शिताफिने जप्त केला होता. त्यापैकी दत्ता शिंदे (रा.राहू) याच्या टोळीकडून 28 गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते. तेव्हापासून सागर पवार हा फरार झाला होता.
तो वाळकी येथे येणार असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाले. यानंतर स्थानिक गुन्हे शोध पथकाने वाळकी येथे जाऊन फरार आरोपी सागर गोरख पवार यास ताब्यात घेतले. त्याच्या टोळीतील इतर साथीदार यांना रोहित्र चोरीच्या गुन्ह्याकामी यापूर्वी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सागर पवार हा फरार झाला होता. त्याच्यावर यवत पोलीस स्टेशन येथे 24 गुन्हे दाखल असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली.
धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस प्रशासनाचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, उपविभगीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, होमगार्ड कमलेश भालेराव यांनी केली आहे.