30 जूनपर्यंत मुदत ः 15 ते 17 कंपन्यांनी नेले निविदा संच
पुणे – शहरातील मुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी पालिकेकडून जपान सरकारच्या जायका कंपनीच्या मदतीने नदी संवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही मुदत 30 जूनपर्यंत असणार आहे. सुमारे 1,235 कोटींची योजना असून आतापर्यंत या कामासाठी जवळपास 15 ते 17 कंपन्यांनी निविदा संच नेले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेस केंद्रशासनाने 2016 मध्ये मान्यता दिली होती. तर, 2021 मध्ये ती पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, त्यानंतर तब्बल दोन वर्षे या योजनेचा सल्लागार नेमण्यात गेली तर पुढे आणखी दोन वर्षे योजनेच्या वादग्रस्त निविदा आणि चढ्या दराने आलेल्या निविदांमध्ये गेली. त्यामुळे या योजनेचा प्रकल्प खर्च 991 कोटी रुपयांवरून 1,235 कोटींवर गेला आहे.
पुढे 15 वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी आणखी 300 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या निविदा महापालिकेने 1 मार्च रोजी जाहीर केल्या होत्या, तसेच त्या भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, शहरातील वाढते करोना संकट तसेच लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी ही मुदत महिनाभराने वाढवून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती.
त्यानुसार, पालिका प्रशासनाने 31 मेपर्यंत निविदांसाठी मुदतवाढ दिली होती. मात्र, या कालावधीत शहरातही लॉकडाऊन वाढविण्यात आले. त्यामुळे अनेक कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आलेली नसल्याने पालिकेने पुन्हा 30 दिवसांनी मुदत वाढविली असून आता 30 जूनपर्यंत निविदा भरता येणार आहेत.
…अशी आहे योजना
या योजनेंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी, शहरात 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारली जाणार असून मुठा नदीत येणारे सांडपाणी संकलीत करण्यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच शहरात स्वच्छतागृहेही उभारली जाणार आहेत.