पुणे – समान पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या 11 टाक्यांना जागा न मिळाल्याने हे काम रद्द करण्यात आले होते. पण आता यापैकी चार टाक्यांना पर्यायी जागा मिळाल्याने स्थायी समितीने 19 कोटी 72 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे.
धानोरी, वडगाव शेरी, विमाननगर येथे या टाक्या बांधल्या जाणार आहेत. महापालिकेकडून 280 कोटी रुपये खर्च करून शहरात पाण्याच्या टाक्या 82 बांधण्यात येणार होत्या. या टाक्या बांधण्याचे काम 2017 मध्ये सुरू झाले. योजनेचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 82 पैकी 42 टाक्यांना जागा मिळाल्याने त्या बांधून पूर्ण झाल्या आहेत तर 21 टाक्यांचे काम सप्टेंबर 2023 अखेर पूर्ण होणार आहे. तर मार्च 2024 पर्यंत उर्वरित 8 टाक्यांचे काम पूर्ण केले जाणार होते. मात्र, या कामातील 11 टाक्यांसाठी जागाच मिळत नसल्याने महापालिकेने या टाक्या रद्द करण्याचा निर्णय घेत केंद्रास तसे कळवलेही होते. तर जागा ताब्यात आल्यानंतर उर्वरित टाक्यांचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यासाठी महापालिका स्वत: खर्च करणार होती.
दरम्यान पाणी पुरवठा विभागाने धानोरी, वडगाव शेरी, विमाननगर येथील संजय पार्क येथे टाक्यांसाठी जागा मिळाल्यानंतर तेथे बांधकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यामध्ये धानोरी येथील 20 लाख लिटरच्या टाकीसाठी 4.29 कोटी, वडगाव शेरी येथील 30 लाख लिटरच्या दोन टाक्यांसाठी 8.74 कोटी रुपये आणि
संजय पार्क येथील 40 लाख लिटरच्या टाकीसाठी 6.69 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यास प्रशासक तथा आयुक्त विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी दिली.