पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर उन्हाळी परीक्षा प्रचलित लेखी पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 8 ते 28 जूनदरम्यान होणार आहे. तीन तासांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त अर्धा तास दिला जाणार आहे.
यासंदर्भात “एमएसबीटीई’चे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. एमएसबीटीईकडून औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा 28 मे ते 6 जून या कालावधीत, तर लेखी परीक्षा 8 ते 28 जून या कालावधीत होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी केवळ उन्हाळी परीक्षांवेळी प्रत्येक तासाला दहा मिनिटे अतिरिक्त, तर तीन तासांच्या परीक्षांसाठी तीस मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहे.
करोना प्रादुर्भावाच्या अपवादात्मक परिस्थितीत बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांद्वारे ऑनलाइन परीक्षांसंदर्भात एमएसबीटीईने प्रसिद्ध केलेली परिपत्रके, आदेश उन्हाळी परीक्षांसाठी लागू राहणार नाहीत. उन्हाळी परीक्षा आणि या पुढील परीक्षांसाठी 2018-2019च्या परीक्षा नियमावलीनुसार निश्चित केलेली मार्गदर्शक तत्त्वे लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.