पुणे – ससून रुग्णालयातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा अहवाल चौकशी समितीने राज्य शासनाला सादर केला आहे. यानंतर शासनाने ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त, तर अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन केले असून, विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.
ललित पाटील प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने 15 दिवसांत आपला अहवाल आयुक्तांमार्फत राज्य शासनाला 31 ऑक्टोबर रोजी सादर केला होता. त्यामुळे राज्य शासन यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले होते.