विद्या प्रतिष्ठानचा उपक्रम
बारामती – विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी, विद्यालयाचा १४ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि ‘उडान हौंसलौं की’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा झाला.
“उडान हौंसलौं की…” हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला. प्रस्तुत कार्यक्रमात सुमारे ६००विद्यार्थ्यांनी अभिनय, नृत्य, गायन, वादन असे कलाकौशल्य प्रदर्शित करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोकराव प्रभुणे म्हणाले की, “डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलेल्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करा. उत्तुंग यश प्राप्तीसाठी झोपेत स्वप्न न पाहता; झोप उडवणारे स्वप्न पाहून ध्येय गाठा. संस्थेच्या सचिव अॅड. नीलिमा गुजर, संस्थेचे सदस्य डॉ. राजीव शहा, माधवी गोडबोले, पालक संघटनेच्या उपाध्यक्षा सुजाता पवार, सहसचिव गौरी देव आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्राचार्या तनुश्री गोरे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्या तनुश्री गोरे, लीला शेट्टी, माधुरी दिक्षित, रुपाली सावरे, फरिदा नबाब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे नेपथ्य व सुशोभिकरण सचिन कुंभार आणि वृषाली साबळे यांनी केले; सूत्रसंचालन कविता मदने आणि नरेंद्र बळे यांनी केले.