बारामतीत सहा महिन्यांत पाच दुर्घटना; डीजीसीएची कारवाई
बारामती – सहा महिन्यांत पाच अपघात झाल्याने येथील विमानतळावरील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग ऍकेडमी वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे देशभरातील कामकाज तत्काळ स्थगित करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनचे डायरेक्टर फॉर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत.
टेक्नम पी 2008 जे या विमानाचा अपघात झाल्याची नोंद घेत डीजीसीएनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात कंपनीला ईमेल पाठवून तातडीने कामकाज स्थगित करत असल्याचे आदेशच देण्यात आले आहेत. याबाबत पाठविलेल्या ईमेलमध्ये अनिल गिल यांनी नमूद केले आहे की, रेडबर्ड या ऍकेडमीचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. तांत्रिक दोषासह इतर देखभाल दुरुस्ती यामुळे हे अपघात घडले आहेत.
डीजीसीए आपल्या संस्थेच्या देखभाल दुरुस्तीबाबत संपूर्ण तपासणी करणार आहे. या शिवाय (डेझिग्नेटेड एक्झामिनर) प्रशिक्षकांची क्षमता व त्यांचे अधिकार तपासले जाणार आहे. या सर्व बाबी पूर्ण होईपर्यंत सर्व ठिकाणचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात येत असल्याचे डीजीसीएकडून या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बारामतीत गेल्या चार दिवसांत रेड बर्ड या विमान प्रशिक्षण कंपनीच्या दोन विमानांचे अपघात झाल्यानंतर डीजीसीएकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली. या अपघातात तीन जण जखमी झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नव्हती. या अपघातानंतर विमानतळ परिसरातील उद्योजकांसह ग्रामस्थांमध्येही काहीसे भीतीचे वातावरण होते, त्यामुळे आता संपूर्ण तपासणी करूनच डीजीसीएकडून पुढील कामकाजाबाबत रेडबर्डला निर्देश दिले जातील.
…अन् विमान झाकून ठेवली
दोन अपघात झाल्यानंतरही रेडबर्डच्या कोणत्याही प्रतिनिधीने या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती तर दिलीच नाही किंवा प्रसिद्धीपत्रकही जारी केलेले नव्हते. अपघात झाल्यानंतर विमान झाकून ठेवली गेली.