श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी
जुन्नर : श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी होती. भाद्रपद श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात असंख्य भाविकांनी श्री गिरीजात्मज गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 5 वाजता देवस्थानचे वतीने महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांकरीता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष संजय ढेकणे, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, गोविंद मेहेर, सदाशिव ताम्हाणे, जयवंत डोके, भगवान हांडे, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, गोळेगाव ग्रामस्थ भाविक उपस्थित होते.
श्री गिरीजात्मज गणेशाचे मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच देवाचे नैवेद्याकरीता मुंबई येथील फळांचे व्यापारी राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे दिली. दिवसभर विविध धार्मिकविधी केले तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या.
भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला. जुन्नर परिसरातून व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते.