शिक्रापूर – हिवरे (ता. शिरूर) येथील गावासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. महिला सरपंच या त्यांच्या दोन महिन्याच्या बाळासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात उपोषणाला बसणार असल्याची माहिती सरपंच दीपाली खैरे व उपसरपंच दीपक खैरे यांनी दिली आहे.
हिवरे ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतच्या मागणीनुसार गावासाठी पाणी पुरवठा योजना डिसेंबर 2022मध्ये मंजूर करण्यात आलेली असताना त्यामध्ये काही त्रुटी असल्याने ग्रामपंचायतने त्यात सुधारणा करण्याची विनंती करत त्याबाबत ग्रामसभेमध्ये ठराव घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना देऊ केले; मात्र त्याबाबत काहीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतल्यानंतर वळसे पाटील यांनी संबंधित अधिकारी व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिन यांना आदेश देत तातडीने कार्यवाही करण्याचे सूचना दिले.
त्यानंतर प्रधान सचिव यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांना डिसेंबर 2023मध्ये सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याबाबतचे आदेश दिले. मात्र त्यानंतर ग्रामपंचायत वेळोवेळी पाठपुरावा करत असताना देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी दिरंगाई करत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यलयात उपोषण करण्याचा निर्णय घेत त्याबाबतचे पत्र देखील या कार्यालयाला दिले.
हिवरेच्या महिला सरपंच दिपाली खैरे या चक्क त्यांच्या दोन महिन्यांच्या बाळासह उपसरपंच दीपक खैरे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांसोबत पाण्याचे मोकळे हांडे, बादल्या घेऊन उपोषणाला बसणार आहे, तर महिला सरपंचांना अधिकार्यांच्या दिरंगाईमुळे उपोषण करण्याची वेळ आल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.