दिवेकरांना संधी मिळाल्याने राष्ट्रवादीत उत्साह
आगामी झेडपी निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण
रवींद्र गुगळे
वरवंड – दौंड तालुक्यात राजकीय आणि सहकाराचे वलय असलेल्या वरवंड येथील दिवेकर कुटुंबातील राहुूल दिवेकर यांच्या गळ्यात पुणे जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. कमी वयात अर्थात वयाच्या 39 व्या वर्षी त्यांना ही संधी राष्ट्रवादीने दिली आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील दबदबा कायम ठेवत उपाध्यक्षपद खेचून आणण्यात माजी आमदार रमेश थोरात यांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यातील झेडपीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बेरजेचे राजकारण केले आहे. दरम्यान, वरवंडसह तालुक्यात राष्ट्रवादीचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे.
मूळ राजकीय वारसा असलेल्या रामदास जर्नादन दिवेकर यांचे वलय दौंड तालुक्यात आहे. वरवंड परिसरात रामदास दिवेकर यांनी राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले. रामदास दिवेकर यांनी पुणे जिल्हा दूध संघामध्ये पद भूषविले आहे. रामदास दिवेकर यांचा मुलगा राहुल दिवेकर यांनी गावगाड्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण वरवंड येथे घेताना दिवेकर यांनी क्रिडा क्षेत्रात नेतृत्वाची झलक दाखविली आहे.
त्यानंतर उच्च शिक्षण मास्टर ऑफ फिजिकल सायन्समध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवी घेतली. वडिलांची परंपरा दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांनी कायम ठेवली आहे. राहुल दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली श्री नागनाथ महाराज विद्या प्रसारक मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायटीवर वर्चस्व आहे. दिवेकर यांना जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर संधी चालून आली. त्यांची बिनविरोध निवड झाली. दौंड तालुक्याला राहुल रामदास दिवेकर यांच्या रुपात दूध संघाला तरुण, अभ्यासू संचालक मिळाला आहे.
सहकारातील दबदबा कायम
उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांचा कडेठाण, हातवळण, कुसेगाव आदी गावांत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून राष्ट्रवादीला मजबूत केले आहे. राहुल दिवेकर यांची अंजली दूध संस्था आहे. तसेच अंजली अर्थमुव्हर्स आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक, सहकारातील कामाची पोचपावती म्हणून जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांची दौंड तालुक्यात बिनविरोध सलामी राष्ट्रवादीला मिळाली आहे.अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे दौंडचे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार रमेश थोरात यांनी राहुल दिवेकर यांच्या उपाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीला पोषक
जिल्हा दूध संघाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांना संधी मिळाली आहे. दिवेकर यांच्या वडिलांपासून सहकाराचा वारसा या कुटुंबाला मिळाला आहे. त्यांची सहकारावर पकड आहे. 25 हजार लोकसंख्या असलेल्या वरवंड गावात ही संधी मिळाली. ही निवड आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उभारी देणारी ठरणार आहे.