सासवड – पुरंदर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी (दि. 6) तहसील कार्यालयात जाहीर झाला. यामध्ये माळशिरस, वीर, भोसलेवाडी आणि आडाचीवाडी या 4 ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसने सरपंचपदासह एकहाती सत्ता मिळवली असून एकूण 51 सदस्य निवडून आले असल्याची माहिती पुरंदर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण यांनी दिली.
एकूण 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपैकी वाल्हे, आडाचीवाडी आणि सुकलवाडी या 3 ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या. पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी सर्व विजयी सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी सासवड येथील कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, महिलाध्यक्षा सुनिता कोलते, प्रभारी अध्यक्ष चेतन महाजन, विकास इंदलकर, विठ्ठल मोकाशी, संभाजी काळाणे, माजी पं. स. सदस्य दिलीप धुमाळ, पिनू काकडे, नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर, सदस्य संदीप फडतरे, पुरंदर नागरीचे सख्यवस्थापक अनिल उरवणे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतींमध्ये तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव यांच्या पत्नी आरती ज्ञानेश्वर (माऊली) यादव यांनी सरपंचपदी 345 मतांनी विजय मिळविला., तसेच 11 पैकी कॉंग्रसचे 8 निवडून आले. तालुक्यातील मोठ्या असणाऱ्या वीर ग्रामपंचायतीमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा ट्रस्टचे अध्यक्ष कॉंग्रेसचे संतोष धुमाळ यांच्या पत्नी मंजूषा संतोष धुमाळ सरपंचपदी निवडून आल्या.
याठिकाणी कॉंग्रेसचे 9 सदस्य निवडून आले. भोसलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे प्रवीण भोसले यांच्या पत्नी शैला भोसले सरपंचपदी तर कॉंग्रेसच्या विचाराचे 4 सदस्य निवडून आले. आडाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून येथे कॉंग्रेसच्या सुवर्णा बजरंग पवार सरपंचपदी विराजमान झाल्या. येथे कॉंग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत.
“पुरंदर हवेलीतील गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. पुरंदर हवेलीच्या विकासाचा रथ असाच पुढे घेऊन जायचे आहे असे असे सांगत आमदार संजय जगताप यांनी सर्व विजयी सरपंच आणि सदस्यांचे अभिनंदन केले. अत्यंत अटीतटीच्या होऊ पाहणाऱ्या माळशिरस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या एकतर्फी विजयाबद्दल आमदार संजय जगताप यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.”- संजय जगताप, आमदार
सेनापती पडले… सैन्य आले…
कोथळे आणि राजुरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. मात्र दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसची सदस्यसंख्या अधिक आहे. राजुरीमध्ये 9 पैकी कॉंग्रेसचे 6 तर कोथळेमध्ये 9 पैकी कॉंग्रेसचे 5 सदस्य विजयी झाले आहेत.
इतर गावांतील कॉंग्रेसचे विजयी उमेदवार
कोथळे : 9 पैकी 5. कर्नलवाडी : 7 पैकी 3. राजुरी : 9 पैकी 6. एखतपूर मुंजवडी : 7 पैकी 3. वागदरवाडी : 7 पैकी 2. वाल्हे : बिनविरोध 2. रानमळा : 7 पैकी 3. वनपुरी : 9 पैकी 1. गुळूंचे : 9 पैकी 1 आणि पोंढे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 1 पैकी 1.