बारामती – शहरात विविध विकासकामे सुरु असून ती वेळेत पूर्ण करुन कामासाठी देण्यात आलेला निधी ३१ मार्चअखेर खर्च होईल, यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणाअंतर्गत करण्यात येणारी कामे, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरात व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होईल असे पेव्हींग ब्लॉक बसवा. परिसराची आकर्षक रंगरंगोटी करावी. मेडद येथील नागरिकांसाठी बगीचा करण्याबाबत नियोजन करा. परिसरातील कऱ्हा नदी सुशोभीकरण व पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. नदी सुशोभिकरणाची कामे करताना पाण्याच्या प्रवाह सुरळीत राहील, याबाबत काळजी घ्या. विद्यार्थ्यांना वसतिगृहात अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने कामे करावीत. स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीनेही नियेाजन करा, असे निर्देश त्यांनी दिले.
नवीन बसस्थानकाचे लवकरात लवकर उद्धघाटन करुन नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करा. मध्यवर्ती भागात नागरिकांना सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजे तसेच परिसर स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे.
यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षकआनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक वृषाली तांबे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.