पुणे – रक्तातील नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात समोर आली आहे. ताडीवाला रोड परिसरात राहणार्या एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
बंडगार्डन परिसरातील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 29 वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पिडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शाळेत 11 वर्षाची ही पिडित मुलगी शिकत आहे. फिर्यादी महिला या समुपदेशक म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन करण्यासाठी त्या या शाळेत गेल्या होत्या. मुलींना त्या ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या 4 वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
ही मुलगी 2017 मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नोव्हेबर 2020 मध्ये ही ताडीवाला रोड येथे असताना तिचा 14 वर्षाचा मोठा भावाने तिच्याबरोबर अनेक वेळा जबरदस्तीने शारीरीक संबंध करुन धमकी दिली. जानेवारी 2021 मध्ये तिचे आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले तर मे 2021 मध्ये तिचा चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.