मॉस्को – युक्रेनविरोधातील संघर्षात रशियाकडून प्रथमच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कुनाशेंकोव यांनी ही माहिती दिली. रशियाने सोडलेल्या या हायपरसोनिक क्षेपणास्त्रामुळे युक्रेनच्या पश्चिमेकडील इव्हानो फ्रॅन्किव्हस्क भागातील एक भूमिगत गोदाम नष्ट करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. या गोदामात क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ल्यासाठीचा दारुगोळा साठवून ठेवण्यात आला होता. तो नष्ट करण्यात आला असल्याचे कुनाशेंकोव्ह यांनी सांगितले.
रशियाने काळ्या समुद्राच्या किनाऱ्याजवळील ओडेसा या बंदरावर हल्ला करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली बेस्टनचाही वापर केल्याचेही या प्रवक्त्यांने सांगितले. रशियाने या प्रणालीचा वापर सर्वप्रथम 2016 मध्ये सीरियातील लष्करी कारवाईच्यावेळी केला होता.
रशियाने युक्रेनमधील मारिऊपूल शहरालाही वेढा घातला आहे. याशिवाय युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लॅन्ट असलेल्या अझोवस्टाल स्टील पलॅन्टवर ताबा मिळवण्यासाठीही रशियाच्या फौजांकडून जारदार चढाई सुरू आहे.
रशियाने युक्रेनच्या पश्चिमेकडील लिव्ह शहरातील केलेल्या हल्ल्यामुळे लाखो नागरिकांनी शेजारच्या देशात पलायन करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 65 लाखांपेक्षा अधिक लोकांनी युक्रेनमध्येच दुसरीकडे स्थलांतर केले आहेत. तर 3.2 लाख लोक युक्रेनबाहेर निघून गेले आहेत.
मारिऊपूल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व्यापारी केंद्र असून काळ्या समुद्राच्या अरुंद खाडीच्या मार्गे हे शहर अनेक मोठ्या बंदरांशी जोडलेले आहे.
मॉस्कोमध्ये रशियाच्या कारवाईच्या समर्थनार्थ मोर्चा…
रशियाच्या लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ मॉस्कोमध्ये एक जोरदार समर्थन मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे देखील उपस्थित राहिले होते. या अतिविशाल रॅलीच्यावेळी किमान 2 लाख नागरिक उपस्थित होते, असा अंदाज आहे. तेवढेच सैनिक देखील रशियाने युक्रेनच्या आघाडीवर पाठवले असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केली आहे.
नाटोच्या युद्धसरावादरम्यान विमान पडून चार सैनिक ठार
दुसरीकडे नाटोच्या संरक्षण विबागाच्या युद्धसरावादरम्यान झालेल्या एका विमान अपघातात अमेरिकेचे चार सैनिक ठार झाल्याचे नॉर्वेच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. यंदाचा युद्धसराव युक्रेनबरोबरचे युद्ध सुरू असतानाच सुरू आहे. या युद्धसरावामध्ये नाटोच्या 27 सदस्य देशांचे 30 हजार सैनिक, 220 विमाने आणि 50 युद्धनौका सहभागी झाल्या आहेत. 14 मार्च रोजी सुरू झालेला हा युद्धसराव 1 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.