पुणे – पुणे शहरात गल्लीबोळातील कोयता गॅंग आणि त्यांच्या दहशतीचा विषय राज्यभर गाजत आहेत. यातच सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचे प्रकरण देशभर गाजले. आता हाच “कोयता’ एका घटनेत पती-पत्नीच्या वादाचे कारण ठरला. यामध्ये पत्नीने पतीला खाली पाडून लाथेने तुडवत जबर मारहाण केली तर पतीने पत्नीच्या डोक्यात कोयता मारुण गंभीर जखमी केले. दोघांमध्येही कोयता घरात ठेवण्यावरुन वाद झाला होता.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. सुवर्णा मुकेश राऊत(29) आणि मुकेश अशोक राऊत(37,रा.स्वप्नपुर्ती सोसायटी, मार्केटयार्ड) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुकेश यांचे नवी पेठेत केशकर्तनालय आहे. तो आई-वडिल, पत्नी आणि सात वर्षाच्या मुलासह मार्केटयार्डमध्ये रहातो. त्याची पत्नी एकदा केश कर्तनालयात आली होती.
तेव्हा कुलकर्णी नावाच्या एका ग्राहकाने तुमच्याकडे कोयता असेल तर मला विका, मला झाडे तोडण्यासाठी हवा आहे असे सांगितले होते. मुकेश घरी आल्यावर सुवर्णाने त्याला मी माहेरुण आंबे तोडण्यासाठी व इतर कामासाठी आणलेला कोयता कुलकर्णी यांना विकून टाका,आपल्याला पैसे मिळतील असे सांगितले.
यावर मुकेशने मी कोयता विकणार नाही, कुणी गैरवापर केल्यास आपल्याला त्रास होईल असे म्हटले. सुवर्णाने तुम्हाला घरात भंगार ठेवायला आवडते का? असे म्हणत वाद घातला. यामध्ये दोघांमधील वाद वाढत गेला. मुकेशने दिलेल्या तक्रारीनूसार सुवर्णाला समजावत असताना तीने मला कोयता मारला, यामुळे माझ्या अंगठ्याला जखम झाली. तीने मला खाली पाडून हाताने आणि लाथेने मारहाण केली.
माझ्या छातीवर, उजव्या डोळ्याखाली आणि पाठीवर मार लागल्याचे म्हटले आहे. तर सुवर्णाने तक्रारीत घराची कडी उघडून बाहेर जात असताना पतीने मारहाण करुन ढकलून दिले. यानंतर कोयता डोक्यात घालून गंभीर जखमी केले असे म्हटले आहे. मारामारीत सुवर्णा यांचे डोके फुटले आहे तर मुकेश याच्या अंगठ्याला लागले आहे.