पुणे – पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावानेच अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक अकाउंट काढले आसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तींनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले असून त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
त्याद्वारे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज आणि फोन करून पैशांची मागणी देखील करण्यात आली. मात्र सतर्क असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या संपर्कातील लोकांनी याची माहिती त्यांना कळविली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी तातडीने एक अर्ज पुणे पोलीस आयुक्तांकडे यांच्याकडे देऊन संशयित आरोपीचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, यापूर्वीही मला माझ्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडल्याची माहिती मिळाली होती. तीनच महिन्यात अशा प्रकारचा दुसरा प्रकार घडला आहे. याबाबत सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीचा शोध घ्यावा, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे.