फलटण – नीरा-देवघर, धोम-बलकवडी ही धरणे, औद्योगिक प्रकल्प, लोणंद-फलटण-बारामती रेल्वे, शेतीसाठी विद्युत जोडणी, अशी अनेक कामे केवळ शरद पवार यांच्या नेतृत्वामुळेच झाली आहेत. जनतेपेक्षा कुणीही मोठा नाही. भीतीपोटी किती दिवस गप्प बसणार? शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी, जनतेने राजकीय दबावातून बाहेर पडावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी केले.
शरद पवार गटाचा फलटण तालुक्यातील पक्ष बांधणीचा पहिला मेळावा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, तुकाराम गायकवाड, रणजित सोनवलकर, तानाजीराव जगताप, अमोल पवार व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातून समाजकारण केले. समाज प्रबोधनातून अनेक पिढ्या घडवल्या. त्याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक-अध्यक्ष आणि देशपातळीवरील नेते शरद पवार काम करत आहेत.
सध्याच्या विचित्र आणि कठीण राजकीय परिस्थितीत राज्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी ‘मी महाराष्ट्रवादी, लढा अस्मितेचा, आपल्या स्वाभिमानाचा’ हा त्यांचा विचार त्यांचे कट्टर समर्थक म्हणून आम्ही फलटण तालुक्यात घरोघरी पोहोचवणार आहोत. ‘घरोघरी राष्ट्रवादी’ हे अभियान यशस्वी करणार आहोत. शरद पवार यांनी फलटण व खंडाळा तालुक्यांसाठी खूप काही दिले आहे. त्यामध्ये कमिन्सचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प, घरोघरी, वाडीवस्तीत, शेतीसाठी वीजपुरवठा, अशी कामे शरद पवार यांच्यामुळेच झाली आहेत. त्यामुळे फलटण तालुका कायम शरद पवार यांच्या पाठीशी राहील. येत्या चार दिवसांत पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात येणार आहेत. नंदकुमार मोरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून, आभार मानले.