पुणे, दि. 15 – दिवाळी आठवडाभरावर आली आहे. त्यात पावसानेही विश्रांती घेतली. त्यामुळे पुणेकरांनी शनिवारी मध्यवर्ती भागांत खरेदीसाठी गर्दी केली. मात्र, या गर्दीने रस्त्यांचा श्वास कोंडला गेला. गर्दी टाळण्यासाठी वाहनचालक नो-एन्ट्रीतून शिरले आणि संपूर्ण रस्ते “ब्लॉक’ झाले.
दिवाळीत खरेदीसाठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे आधीच खरेदी करून घेऊ, या आशेने नागरिकांनी सुट्टी साधून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, आप्पा बळवंत चौक, रविवार पेठेत गर्दी केली. मात्र, वाहनसंख्या पाहता वाहनतळे दुपारीच फुल्ल झाली. त्यामुळे वाहने पार्क करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला. त्यामुळे त्यांनी जागा मिळेल तेथे अस्ताव्यस्त पार्किंग केली आणि कोंडीत भर पडत गेली. सायंकाळी चारनंतर शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, केळकर रस्ता यांसह अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली.
मनस्ताप…मनस्ताप…
“खरेदीला आलोय, मात्र गाडी लावायला जागा नाही. नदीपात्रात गाडी लावायची, पण एक तास झाले ट्रॅफिकमध्ये अडकलोय. “कुठून खरेदीला आलो,’ यांना आत्ताच खरेदी करायची होती का? असा भावना अनेकांच्या मनात येत होत्या. त्या चिडचिडीत कोंडीतून बाहेर पडताना, चालकांकडून हॉर्नचा होणारा कर्णकर्कश आवाज, आरडा-ओरडा यामुळे शहरात दणाणून गेले.
पोलीस कोठेच नव्हते…
खरेदीसाठी गर्दी आणि वाहतूक कोंडी होणार हे निश्चित. पण, कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस, वॉर्डन यांची नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र, पेठांतील अंतर्गत रस्त्यांवर कुठेच पोलीस कर्मचारी कोठेच नव्हते. अखेर स्थानिक तरुणांनी कोंडी सोडवली.
रुग्णवाहिकांना फटका, पण नागरिकांची तत्परता
वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका रुग्णवाहिकांना बसत आहे. यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहचवताना नेहमीपेक्षा अर्धा ते एक तास उशीर होत आहे. हे प्रकार रुग्णांच्या जीवावरही बेतण्याची भीती आहे. बेशिस्त वाहनचालक आणि मोठ्या चारचाकी वाहनांमुळे ही स्थिती उद्भवत असली, तरी रुग्णवाहिकांना रस्ता करून देण्यासाठी युवक पुढे येत आहेत. या कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या हेल्प रायडर्स ग्रुपने जंगली महाराज रस्ता आणि फर्गसन रस्ता, शिवाजी रस्त्यावर सुमारे आठ ते दहा रुग्णवाहिकांना रस्ता उपलब्ध करून दिला. कोंडीमुळे ही वाहने अर्धा-अर्धा तास अडकून पडली होती.