पुणे – मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी दिवसभरात शहरात तब्बल 40 मिळकती कर संकलन विभागाने सील केल्या आहेत. या मिळकतींची थकबाकी सुमारे 8 कोटी 81 लाख 94 हजार 999 रुपयांची आहे.
दरम्यान, महापालिकेने एप्रिल 2023 पासून वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या सुमारे 2 हजार 4 मिळकतींना सील केल्या आहे. या मिळकतींची थकबाकी 123 कोटी 42 लाख 48 हजार 903 रुपयांची थकबाकी आहे. चालू आर्थिक वर्षात महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या 40 टक्के मिळकतकर सवलतीचा गोंधळ झाल्याने महापालिकेने यंदा तब्बल दीड महिना उशिरा पुणेकरांना बिल दिली आहेत.
त्यातच अद्यापही नागरिकांमध्ये सवलतीबाबत गोंधळ असल्याने महापालिकेस आतापर्यंत केवळ 1,500 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या विभागास जवळपास 2,400 कोटींचे उदिष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले आहे. मात्र, उत्पन्न थांबल्याने महापालिकेकडून थकबाकी वसुलीवर भर देण्यात आला आहे.
त्यासाठी सर्व यंत्रणा एकाच वेळी शहरात उतरवण्यात आली असून महापालिकेच्या पेठ निरीक्षकांनी बुधवारी 217 थकबाकीदारांच्या मिळकतींची पाहणी केली. त्यानंतर 80 थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली. 40 मिळकती सील केल्या आहेत. तर पथक कारवाईसाठी पोहचल्यानंतर 97 मिळकतधारकांनी 1 कोटी 80 लाख 60 हजार 771 कर जमा केला आहे.