पुणे – पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने भारत हा शब्द सुमारे ७,५०० पुस्तकांनी लिहून, सौदी अरेबियाचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात भारत शब्दाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, भाजप नेते माधव भांडारी, उद्योजक कृष्कुमार गोयल, आनंद छाजेड, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, राहुल पाखरे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपस्थित होते. गिनिज बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगगरिकर यांनी घोषण केल्यानंतर, विद्यार्थी व प्राध्यापकासह उपस्थित पुणेकरांनी जल्लोष साजरा केला.
ग्रंथ दिंडीत विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी
पुस्तक महोत्वसाच्या पूर्वदिनी गरवारे महाविद्यालय ते फर्गसन महाविद्यालयादरम्यान ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ढोल-ताशा, टाळ मृदुंगाच्या साथीने झालेल्या या ग्रंथदिंडीमध्ये पुणे शहर, जिल्ह्यातील ३० महाविद्यालयांतील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. लोकसेवा ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी “चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक” असा संदेश देत बालभारती ते फर्गसन महाविद्यालय या मार्गावर बाल साहित्य दिंडी काढण्यात आली.
आज महोत्सवाचे उद्घाटन
पुणे पुस्तक महोत्सव दि. १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१६) दुपारी चार वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होईल. अधिकाधिक पुणेकरांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी केले.