पुणे,-पुणे रेल्वे विभागातून डिसेंबर महिन्यात वाहनांची विक्रमी वाहतूक करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात 86 मालगाड्यांतून वाहनांची वाहतूक करण्यात आली आहे. यातून रेल्वेला 13 कोटी 80 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगत एमआयडीसी सुरू झाल्या आहेत, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाला आहे. एमआयडीसी परिसरात टाटा मोटर्स, महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, स्कोडा आणि वोक्सवैगन कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. एमआयडीसी परिसरात वाहनांसाठी आवश्यक सुटे भाग निर्माण करणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत, ऑटोमोबाईल क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वाहनांची इतर राज्यात निर्यात होते.
वाहनांच्या वाहतुकीसाठी रोड ट्रान्सपोर्ट पेक्षा रेल्वे ट्रान्सपोर्ट स्वस्त आणि जलद असल्याने कंपन्या रेल्वेने वाहनांची निर्यात करतात. पुणे विभागातील चिंचवड, खडकी आणि लोणी स्टेशनवरून वाहनांची निर्यात केली जाते. डिसेंबरमध्ये 86 रेल्वेच्या माध्यमातून वाहनांची मालवाहतूक केली आहे. सर्वाधिक 53 रेल्वेने वाहनांची मालवाहतूक चिंचवड स्टेशनवरून झाली आहे. यातून रेल्वेला 13 कोटी 80 लाख रूपये उत्पादन मिळाले आहे. यापुर्वी एप्रिल महिन्यात 66 रेल्वेच्या माध्यमातून वाहनांची वाहतूक केली होती. रेल्वेने मालवाहतूक निर्यात वाढविण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासन अप्पर रेल प्रंबधक ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य प्रमुख डॉ. मिलिंद हिरवे आणि डॉ. स्वप्निल निला यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना करत असल्याचे रेल प्रबंधक इंन्दुराणी दुबे यांनी सांगितले.