नवी दिल्ली – मालदीवच्या संसदेमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीने देशाचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी केली आहे. मालदीवच्या प्रसार माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. मालदीवच्या संसदेमध्ये एमडीपी हा सर्वाधिक जागा असलेला पक्ष आहे.
कालच मालदीवच्या संसदेमध्ये सरकारचे समर्थन करणारे खासदार आणि विरोधी खासदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. चीन धार्जिणे अध्यक्ष मुइझ्झू यांच्या मंत्रिमंडळातील ४ सदस्यांच्या नियुक्तीला मंजूरी देण्यावरून झालेल्या मतभेदावरून ही हाणामारी झाली होती. मावलदीवन डेमोक्रॅटिक पार्टीसह अन्य लोकशाहीवादी पक्षांनी ४ सदस्यांच्या नियुक्तीचा ठराव मतदानापूर्वीच रोखून धरल्यानंतर सत्तारुढ प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव्ज आणि पीपल्स नॅशनल कॉंग्रेसच्या खासदारांनी या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता.
यामुळे संसदेचे सत्र स्थगित करावे लागले होते. त्यानंतर एमडीपी आणि लोकशाहीवादी पक्षांनी मिळून अध्यक्ष मुइझ्झू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही पक्षांकडे मिळून महाभियोगासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ आहे. मात्र या पक्षांनी महाभियोगाचा प्रस्ताव अद्याप संसदेमध्ये सादर केलेला नाही, असे एमडीपीच्या एका खासदाराने म्हटले आहे. एमडीपीच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये अध्यक्ष मुइझ्झू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या मालदीवच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुइझ्झू यांनी माजी अध्यक्ष इब्राहिम मुहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुइझ्झू यांनी तातडीने मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारताच्या ८८ सुरक्षा कर्मचार्यांना माघारी बोलावण्याची सूचना केली होती. त्यासाठी १५ मार्च पर्यंतची मुदत देखील निश्चित केली.
महाभियोगासाठी काठावरचे बहुमत…
मालदीवच्या संसदेत ८७ सदस्य आहेत. महाभियोगाचा प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रीया सुकर करण्यासाठीची घटनादुरुस्ती अलिकडेच करण्यात आली आहे. एमडीपी आणि डेमोक्रॅटिकचे मिळून ५६ खासदार आहेत. त्यात एमडीपीचे ४३ आणि डेमोक्रॅट पक्षाचे १३ सदस्य आहेत. अध्यक्षांना महाभियोगाद्वारे हटवण्यासाठी ५६ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सत्तारुढ पीपीएम आणि पीएनसी आघाडीकडे मिळून २३ खासदारांचे संख्याबळ आहे. या आघाडीने संसदेचे सभापती मोहमद अस्लम आणि उपसभापती अहमद सलीम या दोघांविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. हे दोघेही एमडीपी पक्षाचे सदस्य आहेत.