वाई, ता. 16 – अमेरिकेत असलेली संपन्नावस्था तेथे असलेल्या कॉर्पोरेट पॉवरमुळे निर्माण झाली आहे ही कॉर्पोरेट पॉवर जनतेची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करते. या कॉर्पोरेट पॉवरचे अमेरिकन जीवनात इतके वर्चस्व आहे की, तेथील नागरिकांना निवडीला वावच नसतो. या कंपन्यांच्या फसव्या जाहिरातींमुळे किंवा त्यांनी निर्माण केलेल्या विशिष्ट परिस्थितीमुळे याच कंपन्यांचा माल घ्यावा लागतो. तेथे कसे जगावे याचे स्वातंत्र्य नाही.
जेव्हा दिलेल्या चाकोरीबाहेर जाऊन जीवन जगता येत नाही तेव्हा असंतोष निर्माण होतो. जेव्हा जीवनात तोचतोपणा येतो तेव्हा विरोध अपरिहार्य असतो. आज अमेरिकन विद्यार्थी संत्रस्त आणि संतप्त आहे याला कारण तेथील उपभोगप्रधान समाजव्यवस्थाच आहे, असे उद्गार प्रा. अल्बर्ट डिसूझा यांनी येथील वसंत व्याख्यानमालेत बोलताना काढले.
राष्ट्रीय रसायन शाळेचे राष्ट्रीय कार्य
पुणे – लघुउद्योग व मध्यम पातळीवरील उद्योग सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय व्यवस्थितरित्या चालूच शकत नाहीत, तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त स्वावलंबी व्हावे, कमीत कमी सरकारी मदतीची गरज त्यांना लागावी यासाठी राष्ट्रीय रसायन शाळा कार्ये करतात, त्यादृष्टीने त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडते’, असे उद्गार नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक बी. डी. टिळक यांनी काढले.
पंतप्रधान इंदिरा गांधींना मेस्किकन संस्थेकडून किताब
नवी दिल्ली – मेक्सिकोच्या अकॅडमी ऑफ इंटरनॅशनल लॉ, या आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना “दि मेक्सिकन ऑर्डर ऑफ लॉ’ “कल्चर अँड पीस’ हा शांतता व सांस्कृतिक किताब बहाल केला असून संस्थेचे त्यांना सदस्य करून घेण्यात आले. बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात भारतीय जनता व इंदिरा गांधी यांनी दिलेल्या मदतीबद्दल संस्थेने हा सन्मान खासकरून केलेला आहे.