पुणे – पुण्यात दरवर्षीच खड्ड्यांचा विषय गाजतो. याहीवर्षी पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न थेट विधिमंडळात उपस्थित झाला आहे. शहरात जोरदार पावसाने अद्याप हजेरी लावली नसली, तरी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी झाडाझडती घेतल्यानंतर पथ विभागाने खड्ड्यांची माहिती कळवण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. तसेच खड्डे बुजवण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक साधनसामग्रीसह एक वाहन देण्यात आले आहे.
नागरिकांना आपल्या परिसरातील खड्ड्यांची तक्रार करता यावी, यासाठी पथ विभागाने मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या मोबाइल क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच खड्डे पडलेल्या ठिकाणांची छायाचित्रे आणि पत्ता व्हॉट्सअपद्वारेही पाठवता येणार आहे.
पथ विभागाचे कर्मचारी ही तक्रार नोंदवून घेतील. तशी नोंद प्रशासकीय कागदोपत्री करून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता, आणि रस्ता दुरुस्ती पथकालाही कळवतील, त्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
सिग्नल सिंक्रोनायजेशनमुळे देखील खड्डे
शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी सिग्नल सिंक्रोनायजेशन करण्यासाठी सुमारे 125 सिग्नल्स बदलले आहेत. या सिग्नलसाठी लागणारी वीज आणि इंटरनेटची केबल टाकण्यासाठी चौकांमध्ये वाहने उभी राहातात त्याठिकाणीच खोदाई करण्यात आली आहे. पॅचवर्क करून बुजवलेले हे खड्डे पावसात पुन्हा उघड झाले आहेत. या खड्डयांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून सिग्नलवर हजारो वाहने अडकून पडत असल्याचे चित्र शहरात आहे. याकडेही मनपा प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक रोड मेन्टेनन्स व्हॅन (आरएमव्ही) उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये खड्डे बुजवण्यासाठी लागणारे ब्लॉक, खडी, सिमेंट, डांबर, वाळू यासह कनिष्ठ अभियंता, कर्मचाऱ्यांची टीमही उपलब्ध करून दिली आहे. येणाऱ्या तक्रारीनुसार तातडीने काम करण्याचे आदेश या टीमला देण्यात आले आहेत, असे मनपा पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे म्हणाले.
येथे नोंदवा तक्रार- 9049-27-1003