राष्ट्रपतिपदी रेड्डी यांची निवड जाहीर
नवी दिल्ली, दि. 21 – भारताच्या राष्ट्रपतिपदी नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोध निवड झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर रेड्डी यांची बिनविरोध निवड झाली. निवड झाल्यानंतर त्यांनी जाहीर केले की, “मी देशाच्या व देशवासियांच्या सेवेस वाहून घेईन.’ रेड्डी 64 वर्षांचे आहेत. आंध्रमधील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आतापर्यंत त्यांनी अनेक उच्च पदे भूषविली आहेत.
सिगारेटच्या पाकिटांवर इशारा छापावा
वॉशिंग्टन – अमेरिकेच्या व्यापार खात्याच्या मंडळाने असे जाहीर केले की, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सिगारेटच्या पाकिटांवर कारखानदारांनी असा इशारा छापावा की सिगारेट ओढल्यामुळे मृत्यू ओढवतो. केवळ धूम्रपान प्रकृतीला अपायकारक एवढेच छापून स्वस्थ बसू नये. त्याप्रमाणे सिगारेटमध्ये डांबर व निकोटिन ही विषारी द्रव्ये किती प्रमाणात आहेत तेही प्रत्येक सिगारेट पाकिटावर व जाहिरातीत प्रसिद्ध केले पाहिजे. वरील शिफारस मंडळाच्या 1976च्या अहवालात नमूद केली आहे.