पिंपरी – मजुरांनी चार्जिंगसाठी ठेवलेल्या मोबाइलचे व्हॉट्सऍप स्वतःच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्याद्वारे इतर महिलांना अश्लिल व्हिडिओ कॉल करणाऱ्या एका विकृतास वाकड पोलिसांनी अटक केली.
सम्पतराम शंकरराम (रा. जोधपूर, राजस्थान. सध्या रा. बाणेर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला 7559252350 आणि 9079263678 या क्रमांकावरून अश्लील व्हिडिओ कॉल आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि सुनील टोणपे यांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून त्यास अटक केली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.
आरोपी सम्पत याचे चहाचे दुकान होते. कामावर जाणारे मजूर त्याच्याकडे मोबाइल चार्जिंगसाठी देत होते. जे मोबाइल साधे होते व ज्या मोबाइलमध्ये व्हॉट्सऍप नाही, अशा मोबाइलचे सिमकार्ड तो आपल्या मोबाइलमध्ये टाकत असे. आरोपी सम्पत हा पूर्वी एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता. त्यावेळी आलेल्या ग्राहकांचे नंबर तो आपल्याकडे ठेवत असे. मजुराच्या व्हॉट्स ऍप मोबाइल क्रमांकावरून फर्निचरच्या दुकानातील ग्राहकांच्या मोबाइलवर तो अश्लील फोन करीत असे. त्याने अशाप्रकारे अनेक महिलांना फोन केला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना असे अश्लील व्हिडिओ कॉल येत होते त्यांनी वाकड पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले आहे.