नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हिऱ्यांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. येथील माती दरवेळी अनेकांचं नशीब उजळवते. नुकतीच अशीच काहीशी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात सोमवारी खोदकाम करताना एका शेतकऱ्यांचं नशीब हिऱ्याप्रमाणेच उजळून निघालं. या शेतकऱ्याला तब्बल एक कोटी रुपये किंमतीचा हिरा सापडला.
हिरा सापडलेल्या शेतकऱ्याचं नाव मुलायम सिंह असं आहे. याआधी पन्ना जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना हिरे सापडले आहेत. मुलायम यांना धुळीत पडलेला हिरा सापडला, त्यावेळी त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सुरुवातीला त्यांना वाटलं काचेचा तुकडा आहे. मात्र निरखून पाहिल्यानंतर तो हिरा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या हिऱ्याचं वजन केल्यानंतर तो हिरा 13.47 कॅरेटचा असल्याचं समोर आलं.
हिरा कार्यालयातील, अनुपम सिंह यांच्यानुसार या कच्च्या हिऱ्याची किंमत सुमारे एक कोटी रुपये निर्धारित कऱण्यात आली आहे. मात्र हिऱ्याची मुळ किंमत निलामी केल्यानंतर सरकारी नियम आणि निर्देशांनुसारच निश्चित होईल. निलामीतून येणाऱ्या पैशातून सरकारी रॉयल्टी आणि कर कपात करून उरलेली रक्कम शेतकऱ्याला देण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान हिऱा विकून येणारी रक्कम आपल्या साथीदारांमध्ये समसमान वाटणार असल्याच मुलायम सिंह यांनी नमूद केलं. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणावर काही रक्कम खर्च करणाऱ्या असल्याचं त्यांनी म्हटलं.