नवी दिल्ली – देशाच्या रक्षणासाठी आपले जवान प्राणाची बाजी लावतात. स्वतःच्या जीवाची किंचितही पर्वा न करता आपल्या मातृभूमीसाठी व देशवासियांसाठी आपल्या देशाचे शूर जवान देशसेवा करत असतात. निवडणूक प्रचारसभांमध्ये अनेक राजकारणी आपल्या जवानांची शौर्यगाथा घसा कोरडा पडेपर्यंत ओरडून ओरडून सांगतात. मात्र ज्यांच्या हातात सत्तेच्या चाव्या आहेत अथवा पूर्वी होत्या अशा या राजकीय नेत्यांना खरंच देशासाठी लढणाऱ्या जवानांविषयी आत्मीयता आहे का? असा प्रश्न मेजर डी पी सिंग यांनी केलेली एक पोस्ट वाचून तुम्हाला पडेल.
कोण आहेत मेजर डी पी सिंग?
मेजर डी पी सिंग हे भारतीय लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी कारगिल युद्धामध्ये देशसेवा केली आहे. लष्करात असताना युद्धावेळी लागलेल्या गोळीमुळे त्यांना आपला एक पाय गमवावा लागला होता. एक पाय नसतानाही मेजर डी पी सिंग यांनी पायामध्ये बसवलेल्या ‘ब्लेड’च्या सहाय्याने १२ हाफ मॅरेथॉन धावल्या आहेत. त्यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. ते सैनिकांच्या समस्यांवर देखील काम करत असतात व सैनिकांचे प्रश्न समाजमाध्यमातून इतरांसमोर मांडत असतात.
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. रावत यांच्यासह मृत पावलेल्या १३ जणांचे पार्थिव शुक्रवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. डी पी सिंग यांनी अंत्यदर्शनासाठी तिरंग्यात लपेटून ठेवण्यात आलेल्या पार्थिवांचा फोटो शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
काय आहे मेजर डी पी सिंग यांची फेसबुक पोस्ट
तेव्हा तुम्ही राज्याचा विषय बनता
ते लिहतात, “ज्या १२ शूरवीरांना आपण गमावलं ते आता आपल्या बहुतांश शिलकींसाठी राज्याचा विषय बनतील. हाच तर विरोधाभास आहे! जोपर्यंत तुम्ही लष्कराच्या गणवेशात असता तोपर्यंत तुम्ही देशासाठी लढत असता. मात्र ज्यावेळी तुम्ही सेवानिवृत्त होता, मारले जाता अथवा जखमी होता तेव्हा तुम्ही राज्याचा विषय बनता.”
जवानांच्या मुलांना
जवानांच्या मुलांचा मुद्दा मांडताना त्यांनी, “धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या मुलांना विविध निकष पूर्ण करण्यासाठी सांगितलं जाईल, डोमिसाईल सर्टिफिकेट मागितली जातील.” अशी जाणीव करून दिली.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम
“वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यांमध्ये तर लष्करात काम करणाऱ्या जवानाच्या कुटुंबाला त्या राज्यात १० वर्ष वास्तव्यास असल्यासच डोमिसाईल सर्टिफिकेट देण्यात येत. जे की लष्करात काम करणाऱ्या कोणत्याही जवानाच्या कुटुंबियांना शक्यच होत नाही.”
…म्हणून माझा युद्धात जखमी झाल्यानंतर देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार नाकारला
“डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करा अथवा राज्यातर्फे देण्यात येणारी पुरस्काररूपी वार्षिक रक्कम देण्यात येणार नाही असं मला सांगण्यात आलं. मी राज्यात राहत नसल्याने सर्टिफिकेट सादर करू शकलो नाही परिणामी मला ते नाकारण्यात आलं. हा युद्धात जायबंदी झालेल्या जवानांना राज्यातर्फे देण्यात येणारा एकमेव वार्षिक पुरस्कार आहे.” असं देखील सिंग यांनी सांगितलं.
तत्पूर्वी, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर १२ लष्कराचे अधिकारी व कर्मचारी प्रवास करत होते. यामध्ये रावत यांच्या पत्नीसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यानिमित्ताने डी पी सिंग यांनी जवानांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.