- “अपडेट’ करण्याकडे दुर्लक्ष : प्रशासनाचा सोयीस्कर काणाडोळा; करोना रुग्णांबाबत प्रशासन गाफील
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत रुग्णांची सोय व्हावी, यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांना उपलब्ध बेडबाबतची स्थिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही रुग्णालयाकडून डॅशबोर्ड अपडेट केले जात नाही, याकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालये माहिती संकेतस्थळावर अपडेट करीत नाहीत. मात्र प्रशासनाने सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केले आहे. रुग्णसंख्या वाढत असूनही प्रशासन याबाबत गाफील असल्याची बाब समोर आली आहे.
एकीकडे काही रुग्णालयांकडून डॅशबोर्ड अपडेट करण्याकडे दुर्लक्ष होत असले तरी शहरातील बहुतेक रुग्णालयांचा डॅशबोर्ड अपडेट होत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.
शहरातील खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात किती बेड करोनासाठी आरक्षित आहेत, ऑक्सिजनयुक्त बेड किती आहेत. व्हेंटिलेटर किती आहेत. याची माहिती “डॅशबोर्ड’वर अपडेट करणे बंधनकारक आहे. मात्र या नियमाला अनेक रुग्णालय प्रशासनाने तिलांजली दिली आहे. आदित्य बिर्ला रुग्णालय, आयुश्री रुग्णालय, डी. वाय. पाटील रुग्णालय, लाईफपॉइंट रुग्णालय (वाकड), लोकमान्य रुग्णालय (चिंचवड), सेवाधरम रुग्णालय (मोशी), स्टर्लिंग रुग्णालय, सूर्या रुग्णालय, (कृष्णानगर), विवेकानंद रुग्णालय (भोसरी) या रुग्णालयांनी 25 ऑगस्टपर्यंत नियमाने रुग्णालयाचे अपडेट केले आहेत.
मात्र बहुतेक रुग्णालयांनी अनेक दिवसांपासून आपल्या रुग्णालयातील बेडची स्थिती अपडेट केली नाही. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर रुग्णालय, एजेस रुग्णालय (थेरगाव), आनंद मस्टिस्पेशालिटी रुग्णालय (भोसरी), अपेक्षा रुग्णालय (चऱ्होली), आयुष रुग्णालय (नेहरुनगर), सिटीकेअर रुग्णालय (पिंपरी), देसाई रुग्णालय (भोसरी), ग्लोबल रुग्णालय (वाकड), गोल्डन केअर रुग्णालय (वाकड), गुंजकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय (चऱ्होली), जयहिंद रुग्णालय (भोसरी), जीवनज्योती रुग्णालय (काळेवाडी), लाइफलाइन रुग्णालय, मेट्रो रुग्णालय (रहाटणी), ओजस रुग्णालय (रावेत), आयनॉक्स रुग्णालय (चिंचवड), ऑक्सिकेअर रुग्णालय (वाल्हेकरवाडी), पल्स रुग्णालय (ताथवडे), सक्षम रुग्णालय (थेरगाव), श्री रुग्णालय (सांगवी), स्पंदन रुग्णालय (थेरगाव), स्टार रुग्णालय, वात्सल्य रुग्णालय (डांगे चौक), विघ्नहर्ता रुग्णालय (रहाटणी) या रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या रुग्णालयाच्या बेडची स्थिती वेळेत अपडेट केली नाही.
यामधील काही रुग्णालयांनी 15 दिवसांपासून अपडेट दिले नाहीत. तर काही रुग्णालयांनी आतापर्यंत एकदाही त्यांच्या रुग्णालयातील बेडबाबत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामध्ये चौधऱी रुग्णालय (चिखली), मेडलाईफ रुग्णालय (काळेवाडी), ऑर्चिड रुग्णालय (थेरगाव) या रुग्णालयांनी आजपर्यंत “डॅशबोर्ड’वर माहिती दिली नाही. असे असताना महापालिका प्रशासनाने आजपर्यंत त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने डॅशबोर्डवर माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
एखाद्या रुग्णाचा अहवाल “पॉझिटिव्ह’ आला, तर त्यांना कोणत्या रुग्णालयात बेड, व्हेंटिलेटर आहेत याची माहिती मिळत नाही. त्यामुळे रुग्ण रुग्णालयात पोहचविण्यास उशीर होतो. तसेच नातेवाइकांचीही धावपळ होते. मात्र याकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुर्लक्ष केले आहे.
या रुग्णालयांचा “डॅशबोर्ड’ आहे अपडेट
शहरातील काही बोटावर मोजण्याइतक्या रुग्णालयांनी आजच्या तारखेपर्यंत बेडचे अपडेट दिले आहेत. त्यामध्ये आदित्य बिर्ला रुग्णालयामध्ये 33 बेड शिल्लक आहेत. तसेच 2 आयसीयू व 31 आयसोलेशन बेड उपलब्ध आहे. पिंपरीच्या आयुश्री रुग्णालयात 16 बेड, 3 आयसीयू व 13 आयसोलेशन बेड आहेत. डी. वाय. पाटील रुग्णालयात 45 बेड, 7 आयसीयू व 52 आयसोलेशेन बेड शिल्लक आहेत. वाकडच्या लाइफपॉइंट रुग्णलयात 6 बेड, 4 आयसीयू व 2 आयसोलेशन बेड आहेत. लोकमान्य रुग्णालयात 35 बेड, 5 आयसीयू व 40 आयससोलेशन बेड शिल्लक आहेत. मोशीतील सेवाधरम रुग्णालयात 20 बेड, 7 आयसीयू व 13 आयसोलेट बेड आहेत. स्टर्लिंग रुग्णालयात 6 बेड व 6 आयसोलेशन बेड शिल्लक आहेत. सूर्या रुग्णालय 3 बेड व 3 आयसोलेशन, विवेकानंद रुग्णालयात प्रत्येकी 15 बेड व आयसोलेशन बेड उपलब्ध आहेत.