पुणे – औषधनिर्माणशास्त्र अर्थात फार्मसी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी नोंदणी आणि ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. फार्मसी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. पहिली प्रवेश फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.
अभियांत्रिकीची नियमित प्रवेश फेरी सुरू होत आहे. मात्र फार्मसी प्रवेशासाठी अद्यापही नोंदणी आणि अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली नव्हती. ही प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर राज्य सीईटी सेलने मंगळवारी सायंकाळी फार्मसी प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फार्मसाठी प्रवेशासाठी नोंदणीची मुदत 20 जुलै, तर अर्ज निश्चित करण्यासाठी 21 जुलैची मुदत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी 23 जुलै रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी जाहीर होणार आहे. पहिली प्रवेश फेरी 29 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी 6 ऑगस्ट, तर तिसरी प्रवेश फेरी 15 ऑगस्टपासून सुरू होत आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत 30 ऑगस्ट राहील, असेही राज्य सीईटी सेलने म्हटले आहे.