नवी दिल्ली -बाथरुम सार्वजनिक असले आणि त्याला दार नसून फक्त पडदा असला तरीही बाथरूममध्ये आंघोळ करणे ही खासगी कृती आहे, म्हणून, जर एखादी स्त्री आंघोळ करत असताना एखाद्या व्यक्तीने अशा बाथरूममध्ये डोकावले तर ते भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 क अंतर्गत गुन्हा ठरू शकते, असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले आहे.
न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी यांच्यासमोर एका प्रकरणाचा निवाडा चालू असताना, त्यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे. त्या म्हणाल्या, बंद बाथरूममध्ये आंघोळ करणारी महिला अपेक्षा करेल की तिला कोणी पाहणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिकतेचा आदर केला पाहिजे आणि त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली पाहिजे.
सप्टेंबर 2014 मध्ये एका अल्पवयीन मुलीने आरोप केल्यानंतर दोषीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली होती. आरोपी तिच्याकडे लैंगिक हेतूने पाहत असे आणि जेव्हा ती आंघोळीला जायची तेव्हा तो वेगवेगळ्या बहाण्याने बाथरूमच्या बाहेर उभा राहायचा आणि बाथरूममध्ये डोकावत राहायचा.
आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पीडित महिला सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करायची जे नदी, वॉटर पार्क, स्विमिंग पूल किंवा तलावांमध्ये स्नान करण्यासारखेच आहे. प्रकरणाचा विचार केल्यावर, न्यायमूर्ती शर्मा यांनी नमूद केले की, प्रश्नातील स्नानगृह हे मोकळ्या जागेत असले तरी ती खुली सार्वजनिक जागा नव्हती कारण त्याला भिंती होत्या आणि दार पडद्याने झाकलेले होते.
सार्वजनिक खुल्या जागेत आंघोळ करतानाही अशा महिलांचे फोटो किंवा व्हिडिओ काढले जाणार नाहीत किंवा प्रसारित केले जाणार नाहीत, अशी सामान्य अपेक्षा असेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही व्यक्तीला आयपीसीच्या कलम 354 क नुसार तिचे फोटो, व्हिडिओ इत्यादी घेण्याचा अधिकार नाही.