श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी पक्षाचे संस्थापक सदस्य हुसैन बेग यांनी आज पक्षच राजीनामा दिला.
जम्मू काश्मीरमध्ये आगामी काळात होणाऱ्या जिल्हा विकास परिषदांच्य निवडणूकीत जागा वाटपाच्या मुद्दयावरून झालेल्या मतभेदांमुळे बेग यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
बेग यांनी “पीडीपी’ प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना आपल्या राजीनाम्याविषयी कळवले आहे. मात्र राजीनाम्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यासाठी ते प्रसार माध्यमांना उपलब्ध झाले नाहीत.
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी 1998 साली स्थापन झाल्यापासून बेग या पक्षाशी संबंधित होते. “पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लरेशन’ (पीएजीडी) शी प्रामुख्याने उत्तर काश्मीरमधील जागा वाटपाच्या मुद्दयावरून ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते, असे “पीडीपी’च्या सूत्रांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स आणि सीपीआय (एम) या पक्षांची एकत्रित आघाडी अस्लेल्या “पीएजीडी’ ही आघाडी अलिकडच्या काळात स्थापन करण्यात आली आहे.
“पीएजीडी’ला कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. जिल्हा विकास परिषदांच्या निवडणूकीत जागा वाटपात हिस्सा मिळावा, अशी अपेक्षाही कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. या निवडणुकांना 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी “पीएजीडी’ने गुरुवारी जागा वाटप जाहीर केले. त्यातील बहुसंख्य 27 जागा नॅशनल कॉन्फरन्सला दिल्या गेल्या आहेत. तर पीडीपीने 21 ठिकाणी पीडीपीने उमेदवर उभे केले आहेत.
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील 370 वे कलम गेल्या वर्षी रद्द झाल्यापासून प्रथमच तेथे मोठ्या निवडणूका होत आहेत. जिल्हा विकास परिषदांच्या निवडणूका 8 टप्प्यांमध्ये होणार असल्याचे जम्मू काश्मीरमधील निवडणूक यंत्रणेने म्हटले आहे.