“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीला आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवून हजारो बालकांना,व्यक्तींना जीवनदान देणारे, व त्यांच्या नातेवाईकांना सदैव मदतीचा हात देणारे खेड तालुक्यातील कुरूळी येथील डॉ. अनिल काळे. स्वतः डॉक्टर असून त्यांचे समाजभानही अफाट आहे. कुरूळीमधील व संपुर्ण खेड तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून समाजाप्रती संवेदना असणारे डॉ. अनिल काळे अशी त्यांची कुरूळी परिसरात ओळख आहे. तर करोनाकाळात त्यांनी समाजाप्रती दाखविलेल्या दातृत्त्वामुळे त्यांना कुरूळीकरांनी करोना योद्धा’, देवमाणूस अशी नवीन ओळख दिली आहे. त्यांचा हाच प्रवास दैनिक प्रभात’ने मांडला आहे.
डॉ.अनिल काळे हे मुळचे अ. नगर जिल्ह्यातील देवठाण (ता.अकोले) येथील. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तर उच्च शिक्षण व वैद्यकीय शिक्षण नाशिक येथे झाले. डॉ. अनिल काळे यांच्या रुग्णसेवेच्या कामाचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो 1993 मध्ये. ते त्यावेळी भोसरी येथे त्यांच्या बहिणीकडे आले होते. त्यावेळी त्यांचा भाचा आजारी असल्याने त्याला बालरोग तज्ज्ञ डॉ. गजानन मंकिकर यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉ. काळे मेडिकल क्षेत्रातील असल्याने ते डॉक्टरांशी मेडिकल टर्ममध्ये बोलल्याने डॉ. मंकिकर यांनी त्यांच्यातील गुण हेरले व त्यांना आनंद हॉस्पिटमध्ये रुजू होण्यास सांगितले. तेव्हापासून ते आनंद हॉस्पिटल’शी जोडले गेले. व त्यांचे गुरू डॉ. गजानन मंकिकर यांच्या मार्गदर्शनाखालीच ते आपले कार्य अविरतपणे करीत आहेत.
डॉ. काळे हे 1993 पासून कुरुळी येथे कार्यरत असून त्यांनी 1996 मध्ये कुरुळी गावात छोटी ओपीडी सुरू केली होती. तर 2005 मध्ये आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित नर्सिंग कॉलेजची स्थापना करून या महाविद्यालयातून त्यांनी आजपर्यंत सुमारे 600 ते 750 मुलींना नर्सिंगचे ट्रेनिंग दिले आहे. यातही ते सामाजीक बांधिलकी म्हणून दरवर्षी गरीब, गरजू परंतु रुग्णांची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन ते तीन मुलींना दत्तक घेतात. व त्यांच्या शिक्षणाचा, राहण्याचा व खाण्या-पिण्याचा संपूर्ण खर्च उचलतात. त्यांच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या नर्स आतापर्यंत विविध सरकारी रुग्णालयात कायमतत्त्वावर रुजू झाल्या असून अनेक मुली परदेशातही आपली रुग्णसेवा बजावत आहेत. याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
लहान मुलांच्या आजारांबाबात निष्णात अन् नर्सिंग स्कूल अँड कॉलेजच्या माध्यमातून समाजात उत्तम रुग्ण सेवा देण्यासाठी अष्टपैलू परिचारिका घडवण्याचा त्यांचा हातखंडा निराळाच आहे. डॉ. काळे हे कुरूळी येथील क्लिनिकमध्ये “डे केअर’ चालवतात. तर डॉ. गजानन मंकिकर सर यांच्या मंकीकर हॉस्पिटल भोसरी येथील रुग्णालयात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सन 2018 मध्ये त्यांनी श्री गजानन हॉस्पिटल ची स्थापना करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विविध प्रकारच्या रुग्णांवर व बालकांवर उपचार करीत आहेत. तर “समाजाप्रती काम करताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थीपणे ती सेवा बजवावी व तीही मनापासूनच’ या डॉ. मंकिकर यांनी दिलेल्या कानमंत्रावरच ते रुग्णांची व समाजाची सेवा अविरतपणे करीत आहेत.
भोसरी, कुरूळीत अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबिर, सर्वरोग निदान शिबिर असे आयोजन करून समाजातील विविध घटकांना अल्प खर्चात, मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. समाजाभिमुख दृष्टी असणारे, समाजाप्रती प्रेम असणारे, समाजातील गोरगरीब, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे मनोभावे विचार बाळगून वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर अनिल काळे यांची रुग्णाप्रती व समाजाप्रती असलेला लगाव त्यांना अधिकाधिक कार्याचे बळ देतात असे डॉ. काळे यांचे कुटुंब व त्यांचे निकटवर्तीय अभिमानाने सांगतात.
सन 2006 मध्ये डॉ काळे यांना नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी सर्व प्रकारची मदत करून स्वतः सुप्रियाताई कॉलेजच्या उद्घाटन करण्यासाठी उपस्थित राहिल्या .त्यानंतर 2007 मध्ये आनंद इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यासाठी डॉ. काळे यांना अगदी मनापासून मदत केली. शाळेची तिसरी 10 वीची बॅच शिक्षण घेऊन बाहेर पडली आहे व शाळेत सध्या हजारहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. सर्वांत कमी फी असलेले इंग्रजी माध्यमाचे हे स्कूल म्हणून नावारूपाला आले आहे .यासाठीही सुप्रियाताई यांचे मोलाचे मार्गदर्शन, डॉ. मंकीकर सरांची साथ व स्वामीजींचे आशीर्वाद पाठीशी असल्याने हे सर्व सुकर झाले.
तसेच शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व सरकारी अधिकारी यांचे सहकार्य असल्याचे डॉ. काळे अतिशय आदराने सांगतात, तेव्हापासून आजपर्यंत वैद्यकीय ,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात साहेबांच्या व ताईच्या योग्य मार्गदर्शनाखाली राजकारण ,समाजकारण करत आपला वैद्यकीय व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत. या सगळ्यात कामाचा दर्जा, सर्वांच्या प्रति माणुसकी यात कोणतेही राजकारण न आणता ते रुग्ण व समाजाप्रती आपली जबाबदारी अंत्यत प्रामाणिकपणे पार पाडीत आहेत.
सर्वात उल्लेखनीय म्हणजे डॉ. काळे कुठेही गेले तरी तेथील समाज असो किंवा कोणत्याही प्रकारचे सरकारी अधिकारी अगदी गावातील तलाठ्यापासून तर कलेक्टर ,मंत्रालयातील डेस्क ऑफिसरपासून तर अगदी मुख्यमंत्री, गाव पातळीपासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत कोणत्याही क्षेत्रातील अधिकारी, सचिवालयातील सर्वांचे व सर्व पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकारी यांच्याशी डॉ काळे यांचे नाते अनोळखी असले तरी त्यांच्या अंगी असणारे व्यवहारचातुर्य, मनमिळावू स्वभाव,निस्वार्थी भावना या सद्गुणांमुळे अशा सर्वच दिगग्ज लोकांशी पटकन मैत्री जुळते. व स्नेहसंबंध चिरंतन टिकतात, याचे गुपित अद्याप कुणाला उलगडले नाही.
…अन् सूत्रसंचलनातही ठरले सरस
चिंचवड येथे 2007 मध्ये एका डॉक्टरांच्या कार्यक्रमास तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आदरणीय शरद पवार व डॉ. दिग्विजय खानविलकर, बबनराव पाचपुते साहेब आले होते. त्यावेळी सूत्रसंचालक केवळ तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांचेच नाव घेत होते, त्यामुळे डॉ. अनिल काळे यांनी थेट माइकचा ताबा घेत एका निष्णात सूत्रसंचालकाप्रमाणे कार्यक्राची स्थिती सांभाळत खानविलकरांसह शरद पवारसाहेब व इतर मान्यवर यांना योग्य मान देत कार्यक्रमची शोभा वाढवली होती. त्यांचा हा गुण हेरून तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष डॉ. सेलचे राज्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप घुले यांनी पिंपरी चिंचवड शहराचे डॉ. सेलचे अध्यक्ष म्हणून डॉ अनिल काळे यांची निवड करून पक्ष संघटनेची जबाबदारी दिली व तीही डॉ. काळे यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली.
पक्षाच्या सर्व बैठका व मेळावे यांना उपस्थितीत राहून, प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा संघर्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जवळून पाहिला व कै .डॉ घुले यांच्या मागणीवरून डॉ काळे यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून टाटा 407 रुग्णवाहिका भेट देऊन त्यांच्या कार्याला मदत केली. तेव्हापासून आजपर्यंत सुप्रिया ताईंसोबत डॉ. काळे विविध कामामध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्य करत आहेत. अगदी “बेटी बचाव’ मोहिमेपासून तर ज्या-ज्यावेळी राज्यावर कोणतेही संकट असो, साहेबांनी किंवा सुप्रियाताईंनी आदेश दिला की सर्व वैद्यकीय टीम घेऊन डॉ. काळे तातडीने तेथे जाऊन आपले कार्य करत आले आहे. सांगली कोल्हापूरचे पुराचे संकट असो किंवा रस्त्यात कुठेही अपघात झाला असल्यास डॉ काळे काहीही आणि कितीही महत्वाचे काम असले तरी अपघातग्रस्तांना रस्त्यात सोडून कधीच पुढे जात नाही.
पर्यावरणाचाही ध्यास…
भोसरीतील सर्व समवयस्क मंडळी त्यात डॉक्टर, इंजिनीअर, वकील व इतर लहान मोठे व्यापारी अशा सर्वांना घेऊन “इंद्रायणी सेवा संघ’ ही संस्था स्थापना केली. त्या अंर्तगत इंद्रायणी नदीचा घाट व नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी दर गुरुवार व रविवार सकाळी 7 वाजता सर्व सदस्यांना घेऊन घाट व नदी स्वच्छ करण्याचे काम 2010 पासून आजपर्यंत सुरू आहे. त्याचीही तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.देशमुख साहेब यांनी व सुप्रियाताई सुळे यांनी स्वतः येऊन कामाची पाहणी केली व आमच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सिक्कीमचे तत्कालीन मुख्यमंत्री पवनकुमार च्यामलिंग यांनीही आ. विश्वनाथ कराड साहेब यांच्या समवेत येऊन डॉ. काळे व त्यांचे सर्व सहकारी याचे कौतुक केले. त्याचबरोबर भोसरीतील समवयस्क व उच्चशिक्षित तरुणांना एकत्र घेऊन “जागृती सोशल फाउंडेश’ची 2010 मध्ये स्थापना केली. त्या अंतर्गत जन्मभर रक्तदान व मृत्यूनंतर नेत्रदान हा उपक्रम राबविण्यात येतो. खासदार संभाजीराजे भोसले यांनी एका कार्यक्रमात हे काम बघून आम्हाला प्रेरणा व शुभेच्छा दिल्या.
करोना काळातही राखले समाजभान
सध्या करोना सारखे महाभयंकर महामारीचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. भोसरी शहर व खेड तालुक्यातील कुरूळी गावही याला अपवाद नाही. या काळामध्ये ते स्वत: रस्त्यावर उतरले व गोरगरीब गरजूंना मदतीचा हात दिला. कुरूळी व आसपासची गावे , चाकण औद्योगिक वसाहतीतील गावे. याठिकाणी काम करणारे मजूर हे परराज्यातील. लॉकडाऊनमुळे कंपनी व इतर व्यवसाय बंद झाल्याने या मजुरांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशा वेळी डॉ. काळे यांनी पुढाकार घेत त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली. तब्बल 53 दिवस त्यांची ही सेवा सुरूच होती. याकाळात साधारणत: 8 ते 10 हजार लोकांना त्यांनी अन्नदान केले. त्याचबरोबर परप्रांतीयांनाही घरी जाण्यासाठी त्यांनी मदत केली.
गजानन हॉस्पिटल ठरले करोनाबाधितांना आधारवड
मध्यंतरीच्या काळात खेड तालुक्यात करोना धुमाकूळ घातला होता. त्यामुळे रुग्णांना बेड मिळण्यासाठी पुण्यात धाव घ्यावी लागत होती. मात्र, तिथेही बेड न मिळाल्याने अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. ही भिषणता डॉ. अनिल काळे यांना अस्वस्थ करणारी ठरली. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील श्री गजानन हॉस्पिटलचे रुपांतर कोविड केअर सेंटरमध्ये करण्याचा प्रस्ताव ठेवला.महानगरपालिकेने त्यास लागलीच संमती दिल्याने सध्या श्री गजानन हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे. त्यामुळे केवळ गरिबांसाठीच नव्हे तर प्रत्येक कोरोना रुग्णांसाठी डॉ. मंकिकर व डॉ. काळे हे खरे कोरोना योद्धा ठरले आहेत.
शब्दांकन : सुनील बटवाल, चिंबळी