- कोणत्याही स्थानिक नेत्याला सोबत न घेता पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा
- करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील तयारीचा आढावा आणि सूचना
पिंपरी – राष्ट्रवादीचे युवानेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला आज अचानक भेट दिली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यांशी त्यांनी सुमारे तासभर चर्चा केली. शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केली. करोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. तर त्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन करावे. विशेषत: लहान मुलांच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करावे अशी सूचना केली. तसेच 18 ते 44 वयोगटात कामगार असल्याने त्यांच्या लसीकरणावर भर देण्यात यावा, अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांना केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पार्थ पवार यांनी आपल्या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बाळगली आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेता पार्थ पवार यांनी महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. कोरोना काळात नेता आला की कार्यकर्ते गर्दी करतात. सोशल डिस्टन्ससिंगचा बोजवारा उडालेला दिसतो. यामुळे पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांविना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.
दरम्यान, मागील वर्षी करोना काळात माजी विरोधीपक्ष नेते दत्ता साने यांच्या घरी अचानक भेट दिली होती. तसेच तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत 12 जुलै रोजी भेट घेत वॉर रूमलाही भेट दिली होती. शहरात पार्थ पवार फाउंडेशन यांच्यावतीने मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य वितरण, रक्तदान शिबीर आदी उपक्रम राबविले. मात्र, नेहमी प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिले. आजही पार्थ पवार यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी यांचा लवाजमा न घेता व कार्यकर्त्याची गर्दी होऊ नये, याची काळजी घेत स्वतः आयुक्तांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी आयुक्त व अधिकाऱ्यांसोबत करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली.