बीड – जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पारधी वस्तीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून दाद मागितली.त्याची दखल घेत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीसांना दिले.
बीड जिल्ह्यातील पारनेर (ता. पाटोदा) येथील जमावाच्या हल्ल्यात जखमी अभिमान पांढऱ्या काळे (वय 60) जखमी झाले होते. सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. रविवारी झालेल्या या हल्ल्यात दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता तर आठ जण जखमी झाले होते. प्रिन्स काळे (4) याची प्रकृती चिंताजनक आहे.
पाटोदा पोलीसांनी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली. मात्र, अद्याप मुख्य आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप या महिलांनी केला. या हल्ल्यात एका 20 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाला असून त्याचा उल्लेख आरपपफत्रात नाही. तसेच तिची वैद्यकीय तपासाणी केली नाही असे या महिलांचे म्हणणे असल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
या महिलांची कैफियत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीसांना दिले.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मुलाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार नातेवाइकांनी जमावाच्या हल्ल्यातील मृत मानू काळे (2) याचा मृतदेह तीस तासानंतरही ताब्यात घेतला नव्हता. मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते शवागृहात ठेवण्यात आले आहे. सोमवारी मानू याचे आजोबा अभिमान काळे यांचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे. राजकारण्यांशी लागेबांधे असणाऱ्या मुख्य आरोपींना पोलीस अटक करत नसल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.