नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली. हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगू लागली.
सीमासोबत भारतीय सचिनही सतत चर्चेत असतो. तूर्तास सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या चर्चा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. तपास यंत्रणांना सीमाबाबत असे कोणतेही पुरावे अद्याप तरी मिळालेले नाहीत, ज्यामुळे ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचे सिद्ध होऊ शकेल. सध्या तरी या दोघांना कामासाठी बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे.
अशातच, आता सीमाला चित्रपटात काम मिळालं असल्याचं समोर आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबाबत खुलासा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसची टीम सीमा हैदरला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली. यावेळी चित्रपट दिग्दर्शक जयंत सिन्हा आणि भरत सिंह यांनी सीमा हैदरची ऑडिशन घेतली.
या चित्रपटात सीमा हैदर भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारणार आहे. शिंपी कन्हैया लाल साहूच्या हत्येवर एक ‘टेलर मर्डर स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवला जात आहे. त्या चित्रपटात सीमा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, एटीएसच्या अहवालानंतर सीमा चित्रपटाचे शुटिंग सुरू करेल. असं देखील सांगण्यात आलं आहे.