इस्लामाबाद – पाकिस्तानातील तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाक लष्करी न्यायालयाच्या आदेशांना आव्हान देण्याचा अधिकार पुन्हा प्रदान करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या संसदेने याबाबतच्या विधेयकाला आज मंजूरी दिली. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना अपीलाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्या आदेशांनुसार पाकिस्तानने आज या संदर्भातील विधेयक मंजूर केले.
जाधव यांना पाकिस्तानात हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते. कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणीही भारताच्यावतीने करण्यात आली होती.
त्यानुसार हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै 2019 मध्ये जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत देण्याचे आणि जाधव यांना दोषी ठरवण्याच्या निकालाचा फेरविचारही करण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते. त्यानुसार शिक्षेचा फेरविचार करण्याचे एक विधेयक पाकच्या संसदेने 2020 मध्ये मंजूर केले. मात्र त्याला तेथील विरोधकांनी मोठा विरोध केला होता.
फेरसुनावणीसाठी भारताने वकिल नेमण्याची सूचना पाक सरकारकडून भारत सरकारला करण्यात आली होती. मात्र भारतीय वकीलांना जाधव यांची एकांतात भेट घेण्यास अनुमती नाकारण्याला भारताने विरोध केला होता. पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशांचे पूर्णपणे पालन केले जात नसल्याची टीकाही भारताने केली होती. त्यानंतर जाधव यांना अपील करण्याचा अधिकार प्रदान करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.