पिंपरी – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून सोमवारी (दि. 15) येरवडा आणि शुक्रवारपेठ (पुणे) येथील दोघे रुग्ण करोनामुक्त झाले. त्यातील येरवडा येथील 50 वर्षीय महिलेवर तब्बल महिनाभर उपचार सुरू होते. त्यातील 20 दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महिनाभर झुंज देऊन अखेर “करोना’वर मात करत ती महिला आज घरी परतली.
दरम्यान, बोपोडी येथील 75 वर्षीय वृद्ध आणि इचकेवाडी-कवठेयमाई (ता. शिरूर) येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. बोपोडी, नवी सांगवी, आंबेडकर वसाहत-औंध रस्ता, पर्वती (पुणे) येथील एकूण पाच जण नव्याने करोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. करोनाबाधितांमध्ये बोपोडी येथील एकाच कुटुंबातील दोघे आहेत. 24 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
करोनामुक्त झालेल्या महिलेला सुरवातीला 14 मे रोजी पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून तिला त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
रुग्णालयाकडून तिची करोना चाचणी घेतली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच तिसऱ्या दिवशी तिला अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. 20 दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला वॉर्डात हलविण्यात आले. शुक्रवारपेठ येथील 42 वर्षीय पुरुष देखील करोनामुक्त झाल्याने त्याला आज घरी सोडले.