नवी दिल्ली – पेगॅसस हेरगिरी प्रकरण, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे या विषयावरील आपले म्हणणे पंतप्रधान मोदींना ऐकवण्यासाठी विरोधकांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकण्याचा मार्ग अवलंबला आहे. तृणमुल कॉंग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रीयन यांनी हा तीन मिनीटांचा व्हिडीओ टाकला असून मिस्टर मोदी आता आम्हाला ऐका असा संदेशही त्यांनी जारी केला आहे.
गेले काही दिवस संसदेचे कामकाज ठप्प असल्याने विरोधकांना पेगॅसस आणि शेतकरी आंदोलनाच्या संबंधात सभागृहात चर्चा करण्यास संधी मिळालेली नाही. महत्वाची विधेयके चर्चेशिवाय संमत केली जात आहेत.
सरकारला ही चर्चा टाळायची आहे असा विरोधकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना व्हिडीओ द्वारे आपली भूमिका ऐकवण्याची ही नामी संधी ओब्रीयन व अन्य विरोधी सदस्यांनी साधली आहे. या संबंधात त्यांनी म्हटले आहे की ज्या व्यासपीठावर आम्हाला आमचे म्हणणे सादर करायचे आहे तेथे आम्हाला ही संधी नाकारली जात असेल तर याच्या खेरीज आमच्याकडे दुसरा मार्ग नाही.
त्याद्वारे जनतेलाही आमचे म्हणणे कळवणे हा आमचा हेतू आहे असे त्यांनी म्हटले आहे. या व्हिडीओ मध्ये ओब्रीयन यांच्या खेरीज राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण, कॉंग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, राजदचे मनोज झा, कॉंग्रेसचे दिपेंद्र हुडा, तसेच तेलंगणा राष्ट्रीय समिती, डीएमके, आप आदि पक्ष नेत्यांच्या व्हिडीओंचा समावेश करण्यात आला आहे. यात आम्हाला पेगॅसस व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची आहे असे या नेत्यांनी सरकारला सांगितले आहे.
शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी यात म्हटले आहे की, आमचा आवाज दाबला जात आहे, त्यासाठी आम्हाला आमचे म्हणणे सरकार पर्यंत पोहचवण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.
यापुढील काळातही असेच व्हिडीओ प्रसारीत करून सरकारपर्यंत आपले म्हणणे पोहचवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही विरोधी नेत्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पेगॅसस आणि शेतकरी असा शब्द असलेली जी निवेदने राज्यसभेत केली आहेत त्याचे अंश घेऊन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.