भिवंडी – ओला कार चालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पूलाखाली घडली. प्रभाकर गंडी (वय 43, रा. कणेरी, भिवंडी) असे हत्या झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत प्रभाकर हे भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी गेल्या महिन्यापासून ओला कार चालवत होते. 31 जुलै रोजी दुपारच्या सुमारापासून त्यांची कार मुबंई – नाशिक मार्गावरील माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती. बराच वेळ झाला तरी कारमध्ये चालक ड्रायव्हर सीटवर जागीच बसून असल्याचे दिसले. त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने स्थानिक नागरिकांना संशय आला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारजवळ जाऊन पहिले असता प्रभाकर मृत अवस्थेत दिसले. पंचनामा करून प्रभाकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
मयत प्रभाकर यांच्या पत्नीने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलीसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. मारेकरी पकडल्यानंतरच प्रभाकर यांच्या हत्येचे कारण समोर येईल असे पोलीसांनी सांगितले.