कराची – पाकिस्तानने अफगाणिस्तानसोबत आपल्या चलनाच्या साहाय्यानेच व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री शोकत तारिन म्हणाले, पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानी चलनाचा वापर करुन व्यापार करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानजवळ डॉलर्सची कमतरता असल्याने पाकिस्तान आपल्या चलनाच्या मदतीनेच व्यापार करेल, असे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानातल्या तालिबान सरकारला पाकिस्तानचे प्रारंभीपासूनच पाठिंबा दर्शविला आहे. तर तालिबाननेही पाकिस्तानला आपले “दुसरे घर’ असे संबोधले आहे. आता तालिबानने घेतलेल्या एका निर्णयामुळे पाकिस्तानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे जाणार आहे.
शौकत म्हणाले, अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे. अफगाणिस्तानातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानातून एक गट पाठवण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच अनेक संस्थांनी अफगाणिस्तानला दिल्या जाणाऱ्या फंडिंगवर बंदी घातली आहे आणि देशाची संपत्तीही गोठवली आहे. त्यामुळे तालिबान सध्या आर्थिक संकटात आहे.
दरम्यान, पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही फारशी बरी नाही. पाकिस्तानी अर्थमंत्री तारिन म्हणाले, पाकिस्तानला अफगाणिस्तानसोबत व्यापार केल्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. पाकिस्तानी सरकार चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 4 टक्क्यांहून 4.8 टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 2018-19 साली पाकिस्तानी रुपयांच्या अवमूल्यनामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्या एका डॉलरची किंमत 169 पाकिस्तानी रुपये आहे.